रत्नागिरी:- ऑनलाईन फसवणुकीमध्ये लाखभर रूपये गमावल्याच्या नैराश्यामधून एका तरूणाने जीव देत असल्याचा विचार सुसाईड हेल्पलाईनला रात्री 12.30 वाजता बोलून दाखवला.
हा फोन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून आल्याचे ट्रेस झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला. काही क्षणातच रत्नागिरी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून त्याला प्रतिसाद मिळाला. याची कल्पना आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व पोलिस निरीक्षक सासणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी पोलिसांचे सायबर सेल अलर्ट झाले.
सायबर सेलला या फोन करणाऱ्या तरुणाचे लोकेशन पोलिस नाईक शेख यांनी दिले. त्याबरोबर सायबर सेलने त्या व्यक्तीचे घर शोधले, त्याला तात्काळ फोन केला, त्याच वेळी खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना याची माहिती देण्यात आली. सुवर्णा पत्की यांनी पीएसआय शेणोलीकर, हवालदार साळवी आणि कॉन्स्टेबल धाडवे, येलकर यांना त्या युवकांच्या घरी पाठवले.एकीकडे सायबर सेलचे श्री. गमरे हे फोन वरून त्या युवकाचे समुपदेशन करत होते. त्याचवेळी खेड पोलीस त्या युवकांच्या घरी पोहोचले.
या युवकाची 1 लाखाची ऑनलाईन फसवणूक झाली होती. ते पैसे त्याने बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते. मात्र फसवणूक झाल्यानंतर तो निराश झाला होता आणि त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. मात्र रत्नागिरी पोलिसांचा सोशल मीडिया, सायबर सेल, खेड पोलीस यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका युवकाचा जीव वाचला. या युवकाला ऑनलाईन फसवणुकीप्रकारणी तक्रार देण्यास सांगितले असून आम्ही त्याला संपूर्ण मदत करू असे यावेळी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सांगितले.
संकटात नागरिकांनी खचून न जाता आपल्या समस्येचा मार्ग शोधावा व गरज असल्यास रत्नागिरी पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.