आरोग्य मंदिर घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत

रत्नागिरी:- चाकुचा धाक दाखवून एकाला डांबून ठेऊन संगणक दुकान लुटणार्‍या चौघा संशयितांना शहर पोलिसांनी 24 तासात सीसी टिव्ही आणि गाडीच्या नंबरवरुन अटक केली होती. चोरीस गेलेले 49 लॅपटॉप, 11 मॉनिटर, 2 गेमिंग हेडसेट या मुद्देमालापैकी, 36 लॅपटॉप, 11 मॉनिटर व 1 गेमिंग हेडसेट आदी जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार परत देण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लाड यांच्या हस्ते तक्रारदाराला मुद्देमाल परत केला.

महेश रामचंद्र चौगुले (33, रा. सांगलवाडी सांगली), सुरज सदाशिव निकम (वय 25, रा. कडमवाडी रोड सांगलवाडी सांगली), सुनील चंद्रकात घारेपडे (30, कर्नाळा नांदेरेराडे ता. मिरज जि. सांगली), रेवणसिधु हनुमंत बगले (19, रा. सांगलवाडी सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना 16 फेब्रुवारी 2020 आरोग्य मंदिर येथे ही घटना घडली होती. 36 टॅपटॉप, 11 मॅनिटर, 1 हेडफोन, गुन्ह्यात वापरलेले हत्यार (चाकू) असा सर्व माल व गुन्हा करण्याकरिता वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी असा एकूण 19 लाख 83 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

फिर्यादी युवराज घोरपडे (रा. मुळ- सांगली) यांच्या आरोग्य मंदिर येथील व्यंकटेश या संगणक विक्रीच्या दुकानात संकेत राजेंद्र चव्हाण (वय 21, रा. नेरले, ता. वाळवा, सांगली) हे एकटेच दुकानात असताना तीन अज्ञात लॅपटॉप खरेदीसाठी दुकानात शिरले. संकेत यांना चाकूचा धाक दाखवून त्याला बांधून ठेवले. तोंडाला चिकटपट्टीही लावून दुकानातील 49 लॅपटॉप, 11 मॉनिटर, 3 हेडफोन चोरुन सीसीटीव्ही डिव्हीआर काढून घेतला. फ्लॅटचा बाहेरील दरवाजा बंद करून ठेवला. शेजारच्या एका मुलाने हा प्रकार बघितला होता. त्याने तत्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या पथकाने घटनास्थळीच्या पुराव्यावरुन आणि तक्रारदाराने केलेल्या संशयिताचे वर्णन जाणून घेतले. पोलिसांनी सीसी टीव्ही आणि गाडीच्या नंबरवरून चोरट्यांच्या मागावर पथक गेले. सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि कुपवाडा पोलिसांच्या मदतीने संशयितांना पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली होती. चौघांना संशयित कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर त्यांना जामिन झाला आहे. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी घोरपडे यांना परत देण्यात आला.