बळीराजा चिंताग्रस्त; रोपं वाढीसह भात लावणीत अडथळे
रत्नागिरी:- सलग सहा दिवस जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी पेरणी केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. जुनच्या सुरवातीला पेरणी केलेले शेतकरी लावणीच्या प्रतिक्षेत आहेत. काही शेतकर्यांनी नदीचे पाणी घेऊन त्यावर लावण्यांची कामे सुरु केली आहेत.
शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या मागील 24 तालुक्यात दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी, खेड, संगमेश्वर या तालुक्यात निरंक पाऊस आहे. 21 जूनपासून पावसाने पाठ फिरवली आहे. 1 जुनपासून 21 पर्यंत जिल्ह्यात सरासरी 707 मिमी पावसाची नोंद झालेली होती; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. गेल्या सहा दिवसात 73 मिमी सरासरी पाऊस झालेला आहे. काही तालुक्यांमध्ये अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्यामुळे त्याचा परिणाम भातशेतीवर होणार आहे.
जिल्ह्यात 67 हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आणले जाते. त्यासाठी भात रोप तयार होत आहेत. 100 टक्के पेरणी झाली असून आता रोप वाढण्याची प्रतीक्षा आहे. सुरुवातीला जिल्ह्यात खत टंचाईने शेतकरी त्रस्त होता. आता पावसाने दडी मारल्यामुळे पेरलेल्या भातात पाण्याची गरज आहे. सर्वाधिक फटका कातळावर पेरलेल्या भाताला बसणार आहे. मागील पाच दिवसात सरासरी पाऊस 10 मिमी पेक्षा कमी आहे. पुढील पाच दिवस पाऊस पडला नाही तर पेरलेल्या रोपांसह भात लावणीवर परिणाम होऊ शकतो. शेतकर्यांच्या पारंपरिक अंदाजानूसार पावसाळ्यात मराठी पंचांगानुसार सध्या घोडा हे वाहन सुरु आहे. त्यामुळे या कालावधीत पाऊस पडणार नाही. या वाहनाचा कालावधी संपण्यासाठी चार दिवस आहेत. तोपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहणार आहे.