रत्नागिरी:-गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहून अशैक्षणिक कामे करण्यास सांगितले आहे. शहरातील सर्वच शाळेत शिक्षकांना बोलाविण्यात येत असल्याने शिक्षकांत चांगलीच धाकधूक वाढली असून शाळेतील शिक्षकांची गर्दी कमी करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळेत पुस्तके प्राप्त होत आहेत. त्याचबरोबर शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व महापालिका, जिल्हा परिषद व खासगी संस्थेच्या शाळेतील शिक्षकांना उपस्थित राहण्यास सांगण्यात येत आहे.
रत्नागिरी शहरात तसेच अन्य ग्रामीण भागातही काही शाळा प्रतिबंधित क्षेत्रात येतात. राज्य शासनाने प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील ठिकाणी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात काही भाग हा प्रतिबंधित असतानाही शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येत आहेत. यामुळे एका शाळेत 10 ते 20 पर्यंत शिक्षक एकाचवेळी जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तके व पोषण आहाराचा शिधा देण्यासही सांगण्यात आले आहे. मात्र, शिक्षकांना एकदम मोठ्या संख्येने प्रतिबंधित क्षेत्रातून शाळेत प्रवेश करावा लागत असल्याने या शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका असल्याची ओरड शिक्षकांतून होत आहे.
शहरात प्रतिबंधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात असतानाही शिक्षकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. काही शिक्षण संस्था शाळेतील शिक्षकांकडून वेगळेच काम करून घेत असल्याचीही ओरड करण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणाची तयारीही काही शाळेत करण्यात येत असली तरी यास पालकांचा व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
चौकट
जिल्ह्यातील 747 शाळा क्वारंटाईनसाठी
जिल्ह्यातील 747 शाळा या क्वारंटाईन करण्यासाठी घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे या शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर काही शाळा या जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांच्या तपासणीसाठी घेण्यात आल्या आहेत.