बार्जमधून काढले 7 हजार लिटर काळे तेल

आणखी दोन दिवस मोहीम; भरतीचे अडथळे

रत्नागिरी:- मिर्‍या येथे अडकलेले बसरा स्टार बार्जमधील जळके ऑइल काढण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री आणि आज दिवसभरात सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर काळे ऑइल काढण्यात आले आहे. आणखी दोन दिवस ऑइल काढण्यात येणार आहे. त्यानंतर 25 हजार लिटर डिझेल काढण्याची दुसरी मोहीम हाती घेतली जाणार आहे.

बार्ज वाचविण्याच्या दृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन) मंचलवार यांनी जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी यांना घेऊन जहाजाची तपासणी झाल्यानंतर कालपासून जहाजावरील जळके ऑइल काढण्यास सुरवात झाली आहे आणि डिझेल काढण्यात येणार आहे. त्यासाठी तेल काढण्यासाठी मुंबईहून टँकर मागविण्यात आले आहेत. मात्र उधाणाच्या भरतीमुळे जहाजातील तेल काढण्यास अनेक अडथळे येत आहेत. जहाज बंधार्‍यावर आदळत असल्याने ऑइल आणि डिझेल टाक्यांना धोका निर्माण झाला आहे. गळती झाल्यास समुद्र किनार्‍याचे मोठे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला नोटिस बजावली होती. त्यानुसार काल रात्रीपासून पहिल्या टप्प्यात ऑइल काढण्यास सुरवात झाली. पंप बसवून पाइपद्वारे किनार्‍यावर मोठे बॅरल ठेवून त्यामध्ये हे ऑइल काढले जात आहे. एकदम किनार्‍यावर टँकर जात नसल्याने हा पर्याय काढण्यात आला आहे. आज सायंकाळपर्यंत 30 ते 35 बॅरल म्हणजे सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर ऑइल काढण्यात येणार आहे. आणखी एक ते दोन दिवसात संपूर्ण ऑइल काढायला जाणार आहेत. त्यानंतर जहाजामधील सुमारे 25 हजार लिटर डिझेलसाठा सुरक्षित काढण्यात येणार आहे. त्यामुळे जहाजावरील इंधन रिकामे करायला आणखी चार, पाच दिवस जाण्याची शक्यता आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांनी याला दुजोरा दिला. इंधन काढताना उधाणामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.