बाजारपेठा बंदचा निर्णय अवघ्या काही तासात मागे 

रत्नागिरी:- स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने व्यापार्‍यांनी उत्स्फुर्तपणे पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने जोरदार चर्चा झाली. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांच्या या पोस्ट विरोधात बहुसंख्य व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केल्यावर संघटनेच्या अध्यक्षांनी बाजारपेठ चालूच राहणार असल्याचा खुलासा करीत या विषयावर पडदा टाकला आहे.

स्थानिक पातळीवर कोरोना समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहर परिसरामध्ये मच्छी मार्केट, जेल रोड, नाचणे समर्थ नगर, कोकण नगर, तसेच तालुका संदर्भात बोलायचे झाले तर गोळप, कोतवडे, जयगड, गणपतीपुळे, निवळी, इत्यादी ठिकाणी कोरोनाने आपल्या स्थानिक पातळीवर शिरकाव केल्याचे दिसते. ही धोक्याची घंटा आहे. याला आळा घालण्यासाठी इतर गावातील मार्केटप्रमाणे जसे की कोतवडे, गणपतीपुळे, पावस, लांजा, राजापूर, देवरुख आणि जिल्ह्याबाहेरील सुद्धा स्थानिक पातळीवर कोरोना रुग्ण आढळल्यावर त्या-त्या ठिकाणी आपले संरक्षणासाठी व्यापार्‍यांनी आपणहून  पुढे येऊन उत्स्फूर्तपणे कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण मार्केट बंद ठेवले या धरतीवर आपणही रत्नागिरी शहर बाजारपेठ पाच दिवसांसाठी संपूर्ण बंद ठेवणे गरजेचे दिसते. त्यामुळे सोमवार (ता. 29 ते 3 जुलै 2020 पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याबाबतचा मेसेज सोशल मीडियावर फिरत होता. बाजारपेठ बंद होण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये खरेदीच्या दृष्टीने बाजारात गर्दी होताना दिसत होती.

मात्र आज हा मॅसेज एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरी बाजारपेठ पाच दिवसांसाठी बंद राहणार असल्याची पोस्ट व्हायरल झाली आणि एकच चर्चा सुरू झाली. ग्राहकांमध्ये  संभ्रम निर्माण झाला. या पोस्ट विरोधात बहुसंख्य व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केल्यावर संघटनेच्या अध्यक्षांनी बाजारपेठ चालूच राहणार असल्याचा खुलासा केला आहे. आधीच तीन महिने पोळलेल्या व्यापार्‍यांना पुन्हा पाच दिवसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला विरोध झाल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.