पाणी योजना पुर्णत्वासाठी ठेकेदाराला डिसेंबरची डेडलाईन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या सुधारित नळपाणी योजनेच्या पूर्णत्वासाठी डिसेंम्बर 2020 ही डेडलाईन निर्धारित करण्यात आली आहे. आतापर्यंत 40 टक्के काम पूर्ण केल्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. पुढील 60 टक्के कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी ठेकेदाराच्या हाती असला तरी हे अशक्य काम पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आवाहन आहे.
 

रत्नागिरी शहरासाठी मंजूर झालेली सुधारित नळपाणी योजना सुरवातीपासूनच वादावादीत सापडली. आधी दरवाढीच्या कारणाने ही योजना लांबली. कोकण आयुक्तांकडे बराच कालावधी ही योजना निर्णयासाठी प्रलंबित राहिली. विशेष म्हणजे बीजेपी सरकारच्या कालावधीत ही योजना मंजूर झाली. यानंतर रनपत शिवसेनेची सत्ता आल्याने योजनेच्या अंमलबजावणीत राजकारण शिजले आणि योजना बारगळली.
 

मागील काही दिवसांपासून योजनेने गती पकडली मात्र ती देखील ठराविक प्रभागांपूरती असे चित्र निर्माण झाले. शीळ ते साळवी स्टॉप फिल्टर हाऊस पर्यंत मेन पाईप लाईन टाकून देखील अद्याप निम्म्या शहरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईची समस्या फार गंभीर आहे. केवळ कोकण नगर परिसरातील पाणी समस्या निकाली निघाली आहे.

योजना पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर ठेकेदाराला पुन्हा काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. साडेतीन वर्ष या योजनेचे काम सुरूच आहे. ही मुदत आता डिसेंम्बर 2020 रोजी संपुष्टात येत आहे. या कालावधीत 100 टक्के काम पूर्ण करणे शक्य नसले तरी शहरातील प्रत्येक प्रभागातील पाणी साठवण टाक्यांपर्यंत पाईप लाईन नेण्याचे लक्ष नगर परिषद प्रशासनाने ठेवले आहे. डिसेंबरपर्यंत प्रत्येक पाणी साठवण टाक्यांपर्यंत मुख्य पाईप लाईन जोडली गेल्यास भविष्यातील पाणी टंचाई फार मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.