जि. प. च्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची रुजवात

दोन महिन्यातील स्थिती; चौदा हजार जणांकडून वापर

रत्नागिरी:- शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस परिक्षांच्या कालावधीत कोरोनाने हात-पाय पसरल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणामाची शक्यता होती. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी ब्लॉग सुरु केला होता. टाळेबंदीच्या कालावधीत सुमारे चौदा हजार लोकांनी या ब्लॉगचा वापर केला आहे. ब्लॉग सुरु केल्यानंतर दोन वर्षात मिळाला नाही तेवढा प्रतिसाद दोन महिन्यात मिळाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाची रुजवात शिक्षण विभागाने केली आहे.

मार्च महिन्यात बहुतांश शाळकरी मुलांच्या परीक्षा सुरु होतात. मे महिन्याच्या सुट्टीपुर्वी त्याचे निकाल जाहीर होतात. वर्षभरामध्ये केलेल्या अभ्यासातील क्षमता या निमित्ताने दिसून येते; परंतु याच कालावधीत देशात कोरोना विषाणूूचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यासाठी सरकारने टाळेबंदी केली. याचा परिणाम शैक्षणिक सत्रावर झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे नवीन शैक्षणिक सत्राबाबत साशंकताच आहे. या परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणाचा जोर कायम ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा अवलंबला गेला. त्यात रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडूनही पावले उचलण्यात आली होती.

जिल्हा परिषदेकडून दोन वर्षांपूर्वी तयार केलेला ब्लॉग नव्या स्वरुपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आला. यामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिलेला होता. पहिलीच्या मुलांना कृतीयुक्त शिक्षणासाठी काही मार्गदर्शक व्हिडीओ ब्लॉगवर होते. त्याचा फायदा मुलांना होणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित यासह परिसर अभ्यास, हिंदीचा अभ्यासक्रमही त्यावर अपलोड करण्यात आला होता. हा ब्लॉग सुरु केल्यानंतर मार्च 2020 पर्यंत 27 हजार लोकांनी याचा उपयोग केला होता; मात्र कोरोनाच्या टाळेबंदीत या ब्लॉगचा प्रसार करण्यावर शिक्षण विभागाकडून भर दिला होता. गावागावातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी पालकांपर्यंत ब्लॉग पाठविण्याची व्यवस्था केली होती. एप्रिल, मे, जुन या तिन महिन्यात ब्लॉग पाहणार्‍यांची संख्या 41 हजारावर पोचली आहे. तिन महिन्यात चौदा हजाराहून अधिक लोकांनी या ब्लॉगचा उपयोग केल्याचे दिसून येत आहे. त्या ब्लॉगमधील व्हीडीओही पाहील्याचे लक्षात येत असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक पालक सकारात्मक असल्याचे यावरुन स्पष्ट झाले. भविष्यात ऑनलाईन अभ्यास शिकवण्याचा पर्याय जिल्हा परिषद शिक्षण विभाग गावागावात राबविण्यास सज्ज झाले आहे.


चौकट

शिक्षण विभागाकडून 2017 ला हा ब्लॉग सुर केला होता. मुलांना कृतीयुक्त शिक्षण मिळावे यासाठी हा प्रयत्न होता. त्याचा सर्वाधिक उपयोग कोरोनातील टाळेबंदीच्या कालावधीत झाला. ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक पालक उत्सूक असल्याचे यातून दिसून आले.- संदेश कडव, उपशिक्षणाधिकारी