घरीच क्वारंटाईन राहण्याच्या हट्टापायी पत्नी, मुलालाही कोरोना 

रत्नागिरी:- संस्थात्मक विलगीकरणात राहणार नाही, असा हट्ट त्या पोलीस कर्मचार्‍याचा होता आणि त्या हट्टापायीच तो घरीच होम क्वारंटाईन झाला आणि पत्नीसह मुलाला कोरोनाची लागण झाली, अशी माहिती पुढे आली आहे. कारागृह पोलीस वसाहतीतील इतर कर्मचार्‍यांची तपासणी करून त्यांनादेखील संस्थात्मक क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र आरोग्य यंत्रणेशी हुज्जत घालून काही कर्मचारी आपल्या घरी होम क्वारंटाईन झाले आहेत.

चार दिवसांपूर्वीच रत्नागिरीच्या कारागृहात नेमणुकीला असलेल्या एका कारागृह पोलिसाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्या पाठोपाठ तीन दिवसांनी पोलिसाची पत्नी व त्याच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर धक्कादायक बाबी उघडकीस येऊ लागल्या आहेत. त्या कारागृह पोलिसाला सलग चार दिवस ताप येत होता. अखेरीस तो तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात गेला. जिल्हा रूग्णालयात त्याला संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास सांगितले. मात्र त्याला नकार देत मी माझ्या घरीच क्वारंटाईन होईन असा पवित्रा त्या पोलीस कर्मचार्‍याने घेतला होता. नाईलाजास्तव हुज्जत घातल्याने तो पोलीस स्वतःच्या घरात होम क्वारंटाईन झाला.

या साथीला सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे. आपल्याला ताप येत असल्याचे माहिती असूनसुद्धा आारोग्य विभागाने सांगितलेल्या गोष्टी धुडकावून लावत हा कर्मचारी हट्टाने घरी आला आणि घरातच होम क्वारंटाईन झाला. त्याच्या घरात पत्नी व साडेतीन वर्षाचा मुलगा होता. या कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर पत्नीची व मुलाचीदेखील कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचे अहवाल गुरूवारी रात्री उशीरा या अहवालात पत्नी व मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कर्मचार्‍याच्या चुकीच्या हट्टामुळे पत्नी व मुलाला आता कोरोनाची लागण झाली आहे.
तर दुसरीकडे या कारागृह पोलीस वसाहतीत राहणारे काही कर्मचारीदेखील त्यांच्या संपर्कात आले होते. त्यातील सात कर्मचार्‍यांना आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी नेले होते. मात्र नमुने घेतल्यानंतर त्यांनाही संस्थात्मक विलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला. मात्र या कर्मचार्‍यांनीदेखील चुकीचा हट्ट करून घरीच होम क्वारंटाईन होणे पसंत केले आहे. त्यामुळे या चुकीचा नाहक त्रास इतरांना भोगावा लागणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर कारागृह पोलीस वसाहत पोलिसांनी सील केली आहे. या ठिकाणी सर्वच कुटुंबियांची तपासणी केली जाणार असून वसाहतीत यापूर्वी कोण कोण येऊन गेले याची माहितीदेखील घेण्याचे काम सुरू झाले आहे.