किरकोळ वादातून फ्रीस्टाईल हाणामारी; एकावर चाकूने वार

रत्नागिरी:- किरकोळ कारणावरून आठवडा बाजारात दोन फळ विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी होऊन एका विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजारात परिसरात घडली. यातील जखमी तरूणाला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

आठवडा बाजार परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या आरसीसी सिडीवर बसून दोन फळ विक्रेते मित्र चेष्टामस्करी करीत होते. हा प्रकार सुरू असतानाच दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याचे पर्यावसान तुफान हाणामारीत झाले. यावेळी एका विक्रेत्याने आपल्या सहकारी फळ विक्रेत्याच्या मानेवर चाकूने वार केला. त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. नेमका हा वाद कशावरून झाला याची माहिती मिळू शकली नाही. जखमी विक्रेत्यावर सध्या उपचार सुरू असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.