खेड:- खेड ते भरणा नाका मार्गावरील आठवडा बाजाराजवळ भरणा नाक्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या वेर्ना कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने दोन दुचाकी व शासकीय रुग्णवाहिकेच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिल्याने झालेल्या चौरंगी अपघातात प्रकाश विक्रम चव्हाण (वय-50 रा. खेर्डी ता. चिपळूण) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात काल दुपारी झाला.
मिळालेल्या माहितीप्रमाणे वेर्ना कार ( एमएच 06 बीएम 6555) वरील चालक सैफअली मोहजम परकार(रा. खेड) खेड भरणा नाका मार्गावर चालवित असताना चालकाचा कारवरचा ताबा सुटल्याने पुढे असणारी दुचाकी ( एमएच 08 एन 7278) ला जोराची ठोकर दिली. यानंतर रस्त्याच्या कडेला खेडच्या दिशेला उभी असलेली शासनाच्या आरोग्य विभागाच्या 108 रूग्णवाहिकेच्या डाव्या बाजूला जोराची ठोकर देत पल्सर दुचाकी (एमएच 08 एडी 3793) लाही जोराची ठोकर दिल्याने झालेल्या चौरंगी अपघातात 5 जणाना गंभीर दुखापत झाली. यापैकी प्रकाश विक्रम चव्हाण (वय-50 रा. खेर्डी ता. चिपळूण) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या सर्वाना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. कार चालकावर भादंवि 304(अ), 279, 337, 338 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोनि सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सोमनाथ कदम करीत आहेत.