जिल्हाधिकार्यांना निवेदन; मनमानी थांबवा अन्यथा जनआंदोलन
रत्नागिरी:- कच्च्या तेलाचे दर स्थिर असताना इंधन दरवाढीकरीता सबळ कोणतेही कारण नसताना केवळ सरकारने मनमानी केली आहे. अत्यावश्यक इंधनांचे वाढविलेले दर तात्काळ कमी करावे आणि जनतेची होणारी हेळसांड थांबवावी. अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल असा इशारा देत मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पेट्रोलजवळ बैलगाडीवरुन अनोखे आंदोलन केले.
जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रुपेश सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी बैलगाडीवरुन येत आंदोलन केले. इंधनाचे वाढते दर पाहता सामान्य नागरिकांना बैलगाडी चालवावी लागेल असा इशारा मनसे पदाधिकार्यांनी दिला. देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव सुरु असतानाच त्या पाठोपाठ सागरी किनारपट्टीवर ओढावलेले निसर्ग चक्रीवादळाचे महाभयंकर संकट यामुळे सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वच जण अर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. पेट्रोल, डीझेल या अत्यावश्यक इंधनांचे दर सातत्याने वाढवत असुन गेल्या 15 दिवसात पेट्रोल सरासरी 8 रुपये तर डीझेल 9 रूपयाने वाढले आहे. ही बाब अत्यंत दुदैवी व निषेधार्थ असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या इंधन दरवाढीचा जाहीर निषेध केला आहे. कोरोना महामारीच्या अनुषंगाने सरकारनेच टाळेबंदी जाहीर केली. या टाळेबंदीत अनेकांचा रोजगार गेला. अनेक उद्योगधंदे उध्वस्त झाले आहेत. शेतकरीवर्ग नेस्तनाबूत झाला आहे. या दयनीय अवस्थेचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. केंद्र व राज्य सरकारने विविध मार्गाने दिलासा देणे गरजेचे असतानाच पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले आहेत. टाळेबंदीमुळे महागाईत पुन्हा प्रचंड वाढ होऊन आपल्या जिल्ह्यासह संपुर्ण देशवासीय बांधवांना उपासमारीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात अनेक गैरकृत्यांचे प्रमाण वाढेल आणि त्याचा थेट परीणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनशैलीवर होणार आहे.
जनतेची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी सरकारने सकारात्मक विचार केला पाहीजे. अन्यथा जन उद्रेक होईल. कच्च्या तेलाचे दर स्थिर असताना इंधन दरवाढीकरीता सबळ कोणतेही कारण नसताना केवळ सरकारने मनमानी केली आहे. अत्यावश्यक इंधनांचे वाढविलेले दर तात्काळ कमी करावे, जनआंदोलन छेडावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.