हलगर्जीपणा करणाऱ्या कंपनीवरच गुन्हा दाखल करा

युवासेना उपतालुका अधिकारी आशिष भालेकर यांची मागणी

रत्नागिरी:- एका कंपनीच्या चुकीमुळे हाँटेल व सलून चालकावर गुन्हे दाखल झाले आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्या कंपनीवरच थेट गुन्हे दाखल करा अशी मागणी युवसेना उपतालुकाअधिकारी आशिष भालेकर यांनी केली आहे. लवकरच त्याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे भालेकर यांनी सांगितले.

या परिसरामध्ये दोन मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये  मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग व अधिकारी वर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळले असून परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच १७ जून रोजी आलेल्या ओएनजीसीच्या जहाजावरील ५ कर्मचाऱ्यांचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र या जहाजावर नेमके किती कर्मचारी आहेत याची माहिती संबंधित यंत्रणेला असणे गरजेचे आहे. मात्र तशी माहिती यंत्रणेला दिली होती का? असा सवाल भालेकर यांनी केला आहे.

वाटद जिल्हा परिषद गटात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानच दुरुस्तीसाठी आलेल्या जहाजावरील कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे कामगार जयगड ते गणपतीपुळे या भागात सर्वत्र फिरले असून त्यांच्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकट काळात खबरदारी घेणे हि कंपन्यांची देखील जवाबदारी आहे मात्र या प्रकारातून बेजबाबदारपणा केल्याचे निष्पन्न होत असल्याची तक्रार भालेकर यांनी केली आहे.

एकीकडे कोरोनाचे संकट अधिकच गडद होत असतानाच असे बेजबाबदारपणाचे प्रकार उघड होत असून येथील जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.असले प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा आशिष भालेकर यांनी दिला आहे.

ज्या कंपन्यांनी खबरदारी घेणे गरजेचे होते त्या कंपन्यांनी हलगर्जीपणा केला आहे. मात्र असे असतानाच चुकीच्या पद्धतीने हॉटेल मालक व एका सलून चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला अशा कंपनीवर थेट गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी करत त्याबाबतचे लेखी निवेदन जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षकांना देणार असल्याचे युवासेनेचे आशिष भालेकर यांनी सांगितले.