मिऱ्या येथील बार्ज बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू

पहिल्या टप्प्यात डिझेल काढणार

रत्नागिरी:- मिर्‍या येथे अडकलेल्या बसरा स्टार जहाज काढण्याच्या रेस्क्यू ऑपरेशला सुरवात झाली आहे. पहिला टप्पा म्हणून काल सायंकाळी जहाजातील 25 हजार लिटर डिझेल काढण्याचे काम सुरू झाले आहे. ओहोटी पाहून पंपाद्वारे हे डिझेल काढण्यात येणार आहे. त्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांनी दिली.  

भरकटून मिर्‍या येथे अडकलेले इंधनवाहू बसरा स्टार काढण्यासाठी भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन) मंचलवार, जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी यांना घेऊन काल जहाजाची तपासणी केली. डिझेल काढण्यासाठी मुंबईहून मागविण्यात आले टँकर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. उधाणामुळे डिझेल काढण्याच्या कामात आज दुपारपासून अडथळे आहे. मात्र सायंकाळी समुद्राच्या ओहोटीचा फायदा घेऊन डिझेल काढण्याच्या कामाला सुरवात झाली. शिपिंग कंपनी आणि जहाजावरील क्रू च्या मदतीने विद्युत पंप जोडून सायंकाळी डिझेल काढण्याच्यादृष्टीने तयार करण्यात आली. पंपाची पाइप जहाजावरून खाली घेऊन बंधार्‍यावरून ती टँकरपर्यंत आणण्यात आली होती. मात्र लाटामुळे जहाज हेलकावे खात असल्याने प्रत्येक्ष डिझेल ऑपरेशन सुरू झाले नव्हते.
मात्र उशिरा डिझेल काढण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. हवामानाचा फायदा घेऊन दोन ते तीन दिवसात डिझेल काढण्यात येणार आहे. डिझेल काढल्यानंतर गळतीचा धोका कमी होणार आहे. त्यानंतर जहाज काढण्याचे मुख्य रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे. डिझेल काढताना आजूबाजूचा भाग हा प्रवेश बंद करून डिझेल काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नोटीस बाजावल्याचे परिणाम 

डिझेल गळतीची नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यामुळे तत्काळ डिझेल काढण्याबाबत ग्रामस्थांनी बंदर विभागाला निवेदन दिले होेते. त्याची दखल घेऊन समुद्र किनारा सुरक्षिततेच्यादृष्टीने बंदर विभागाने संबंधितांना नोटीस बजावल्याने डिझेल काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.