रत्नागिरी:- गोवा बीचच्या धर्तीवर कोकणातील समुद्रकिनार्यावर सीआरझेड सांभाळून हॉटेल निर्मितीची ‘शॅक्स’ योजना राबविण्याचा प्रस्ताव उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनासमोर ठेवणार आहे. त्याला शासनाने मंजुरी दिल्यास कोकणात पर्यटन विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय यांनी यांनी व्यक्त केला. तसेच रोजगार हमी योजनाही पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र त्याचा पर्यटनदृष्ट्या अपेक्षित वापर किंवा विकास झालेला नाही; मात्र गोवा राज्याने समुद्र किनार्यावरच सीआरझेड सांभाळून हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. किनार्यावरही हॉटेल व्यवसायाला पर्यटकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने गोवा राज्याला पर्यटनातून मोठा महसूल मिळतो. यातूनच गोव्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला आहे. गोव्याच्या या शॅक्स योजनेच्या धर्तीवर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, नवी मुंबई आदी भागाच्या समुद्र किनार्यावर सीआरझेड सांभाळून हॉटेल व्यवसायाला परवानगी मिळावी, अशी मागणी उद्या (ता. 25) कॅबिनेटच्या बैठकीत करणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास कोकण पर्यटनाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. कोकणावर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.
खासदार शरद पवार यांनी 1992 मध्ये रोजगार हमी योजना सुरू केली. 100 टक्के अनुदानावर ही फळबाग लागवड सुरू केली. खड्डा मारण्यापासून ते फळ लागण्यापर्यंत 100 टक्के अनुदान देण्यात येत होते. ही योजना परत सुरू करण्याची आमची मागणी आहे. या योजनेतूनही गरीब आणि तरुणांना रोजगार निर्मिती होणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.
चौकट–
हर्णैमध्ये (ता. दापोली) चुकीच्या पद्धतीने पंचनामे झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. ज्यांचे नुकसान झालेले नाही त्यांची नावे यादीमध्ये आहेत. यावर सामंत म्हणाले, मी प्रांताधिकार्यांशी बोलून घेतले आहे. नेमका काय प्रकार आहे हे मी परवा पुन्हा दापोली, मंडणगड दौर्यावर जाणार आहे तेव्हा याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.