रत्नागिरी:- ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाख किनारपट्टी भागाला बसला असून त्यात गुहागर, दापोली, मंडणगड तालुके सर्वाधिक बाधित झाले आहेत. यामध्ये मच्छीमारांचेही मोठे नुकसान झालेले आहेत. सहाय्यक मत्स्य विभागाकडून सुरु असलेल्या पंचनाम्यात 585 नौकांचे सुमारे 24 लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धनजवळ लॅण्ड झाले आहे. त्यामुळे दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्याला बसला आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी 4 जूनपासून दिवस-रात्र आणि पावसात भिजून पंचनामे करीत आहेत. चक्रीवादळाने नुकसान झालेल्या नौकांचे पंचनामे 4 जूनपासून केले जात आहेत. मच्छीमार नौकांसह मत्स्य संवर्धन तलावांच्याही नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. 19 जूनपर्यंत झालेल्या पंचनाम्यांमध्ये 585 नौकांचे अंशत: नुकसान झाले आहे. हे नुकसान 23 लाख 98 हजार 500 रुपयांचे आहे. पूर्णपणे नुकसान नौकांची संख्या 9 असून हे नुकसान 86 हजार 400 रुपयांचे आहे. 333 जाळ्यांचे पूर्णत: नुकसान झाले असून ते 8 लाख 65 हजार 800 रुपयांचे आहे. 6 मत्स्य तलाव किंवा कोळंबी संवर्धन प्रकल्पाचे नुकसान झाले असून 3.60 हेक्टर मधील 29 हजार 580 रुपयांचे नुकसान झाले आहे. 6 मत्स्य संवर्धन तलावांच्या 5.6 हेक्टर क्षेत्रातील 68 हजार 320 रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूरला सुदैवाने चक्रीवादळाचा फारसा फटका बसलेला नाही. तरीही या तालुक्यातील नाटे बंदरावरील नौकांची पाहणी केली जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर, मंडणगड, दापोली, राजापूर तालुक्याना समुद्रकिनारा लाभला आहे. तब्बल 167 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. 3 जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा प्रभाव पहाटे 3 वाजल्यापासून रत्नागिरीत सुरू झाला. रत्नागिरीत वादळाचा वेग तुलनेत काहीसा कमी असला तरी सकाळी 11 वाजता गुहागर, दापोली, मंडणगडात घुसलेल्या या वादळाचा वेग मोठा होता. त्यामुळे येथील नुकसानीचे प्रमाणही मोठे आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त नागराज भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर, शीतल कांबळे, संतोष देसाई, दिप्ती साळवी, जीवन सावंत यांच्यासह रविंद्र मालवणकर, प्रविण सुर्वे, तृप्ती जाधव यांच्यासह अधिकारी-कर्मचारी प्रत्येक्ष बंदरावर जाऊन पंचनामे करत आहेत. रत्नागिरीतील मिरकरवाडा, जयगड, फणसोप, काळबादेवी बंदरांवर उभ्या असलेल्या नौकांचे नुकसान झाले. गुहागरातील काताळे, पडवे, कोंडकारूळ, दापोली-मंडणगडमधील पाज, हर्णे, दापोली, मंडणगड, आंजर्ले, केळशी, वेसवी आदी बंदरांवरील नौकांचे नुकसान झाले.