क्वारंटाईन व्यक्तींच्या हातावर शिक्के मारले नाहीत; जिल्हा रुग्णालय प्रशासन अडचणीत

रत्नागिरी:- जयगड पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींमध्ये राहणार्‍या त्या खासगी कंपनीमधील अधिकारी, कर्मचार्‍यांची माहिती तत्काळ ग्राम कृतीदलाला कळवा अशा सुचना जिल्हा प्रशासनाकडून कंपनी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के का मारले गेले नाहीत याची सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून सरपंचांना देण्यात आले.

ओएनजीसी नौकेवरील चार कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यानंतर गोंधळ उडाला होता. त्या चारही कर्मचार्‍यांना गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर जयगड पंचक्रोशीत ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रातांधिकारी विकास सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत मालगुंड सरंपच दिपक दुर्गवळी, गणपतीपुळेचे महेश ठावरे, वरवडेचे निखिल बोरकर, निवेंडीच्या मायंगडे, जयगडच्या श्रीमती फरजाना आणि चौगुले, लावगण, जेएसडब्ल्यू कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मालगुंड सरपंच दुर्गवळी यांनी प्रशासनाकडून झालेल्या चुकांवर बोट ठेवले. ते म्हणाले, गणपतीपुळे येथील लॉजमध्ये कोरोना बाधित कामगार सापडले आहेत. त्या हॉटेलवाल्यांना क्वारंटाईन केंद्र म्हणून परवानगी दिली असेल तर त्याची माहिती ग्रामकृती दलाला का दिली गेली नाही. त्या ठिकाणी अनेक स्थानिक कामगार काम करत आहेत. ते गावामध्ये ये-जा करतात. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी याचे वास्तव्य पाच गावांमध्ये आहे. गेली तीन महिने कोरोनापासून मुक्त ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली आहे. या परिस्थितीत गणपतीपुळे येथे झालेला प्रकार अयोग्य आहे. त्यावर प्रशासनाने योग्य ती दखल घेतली पाहीजे. तसेच यावेळी गणपतीपुळे सरपंच ठावरे यांनी नियम फक्त् ग्रामस्थांनाच ठेवू नये अशी मागणी केली. क्वारंटाईनसाठी हॉटेल घेतले असेल तर त्याला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली जाते. त्यांच्या हातावर शिक्का का मारला जात नाही याबाबत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली.

सरपंचांची मते लक्षात घेतल्यानंतर प्रांत सुर्यवंशी यांनी झालेल्या प्रकाराची योग्य ती चौकशी सुरु असल्याचे सांगितले. तसेच ज्या कंपन्यांमधील कर्मचारी, अधिकारी या पाच गावात वास्तव्याला आहेत, त्यांची माहिती तत्काळ ग्राम कृतीदलाला कळविण्यात येणार आहे. तशा सुचना कंपन्यांना दिल्या गेल्या आहेत. शक्य असल्यास संबंधितांची व्यवस्था कंपनी परिसरात करण्यात यावी असेही सांगितले. परराज्यातून आलेले असतानाही त्यांच्या हातावर शिक्का का मारला नाही, याची सखोल चौकशी करणार असल्याचे आश्‍वासन सरपंचांना दिल्याची माहिती दुर्गवळी यांनी सांगितली. मालगुंड परिसरामधून जयगडमधील खासगी कंपन्यांमध्ये ये-जा करणार्‍यांची संख्या पन्नासपेक्षा अधिक आहे. ही माहिती तत्काळ ग्रामपंचायतीकडून जमा करण्यात आली आहे. ती प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.