उद्यमनगर येथे तरुणावर धारदार शस्त्राने वार 

रत्नागिरी:-मित्राच्या गॅरेजमध्ये दिलेल्या गाडीची चौकशी करायला गेलेल्या युवकावर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दानिश जमीर पटेल हे मच्छी व्यावसायिक आहेत. त्यांच्या शमसुद्दीन कुंदापुरा (रा. नौदा, कर्नाटक) या मित्राने उद्यमनगर येथील शब्बीरखान यांच्या गॅरेजमध्ये स्वतःची मोटारसायकल दुरुस्तीला दिली होती. या गाडीची चौकशी करून काम झाले का हे पाहूया असे मित्राने दानिश याला सांगितले होते. गॅरेजमधील मूकद्दर अक्रम जमादार (रा. किर्तीनगर) हा माणूस आपल्याला त्रास देत असल्याचेही त्याने दानिशला सांगितले होते.

सोमवारी दानिश दुपारी 1.30 च्या दरम्यान शब्बीर खान यांच्या गॅरेजमध्ये गाडीची चौकशी करायला गेला होता. यावेळी तो गॅरेज मालक याच्याशी बोलत असताना संशयीत आरोपी मूकद्दर तेथे होता. यावेळी दानिश गॅरेज मालकाकडे गाडीची चौकशी करत असल्याचा राग आला आणि त्याने दोघांच्या संभाषणात हस्तक्षेप करत दानिशला शिवीगाळ करत जोरात ढकलून दिले. यावेळी तेथील लोकांनी दानिशला उचलले असता या संशयिताने दानिशच्या मागून येऊन दानिशच्या डोक्यावर,छातीवर, पाठीवर, खांद्यावर धारदार हत्याराने वार केले आणि ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी दानिश पटेल यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्थानकात भा. दं. वि. क. 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.