बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला 

रत्नागिरी:- अमावस्येच्या भरतीला मासे गरवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी पहाटे ८ वा.च्या सुमारास आढळला. ज्या ठिकाणी हा तरुण बुडाला होता तेथून १०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळला आहे.

वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी जयगड) हा तरुण आपल्या मित्रांसमवेत मासे गरवण्यासाठी गेला होता. जयगड-कासारी येथील बंधाऱ्यावर हे सर्व मित्र मासे गरवत होते. रविवारी अमावास्या असल्याने समुद्रालादेखील चांगलेच उधाण आले होते. तसेच नजीकच्या खाड्यांनादेखील उधाणाची भरती आली होती, तर काही ठिकाणी पाऊसदेखील धो-धो कोसळत होता. यावेळी मासे गरवत असताना वीरांची याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. उधाणाच्या भरतीत पडलेला वीरांची काही क्षणातच दिसेनासा झाला.वीरांची पाण्यात पडल्यानंतर त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. हा आवाज ऐकून नजीकच्या ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, वीरांची हा खोल पाण्यात दिसेनासा झाला होता. या घटनेची माहिती जयगड पोलिसांना मिळताच पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उधाणाच्या भरतीमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

वीरांची पाण्यात बेपत्ता झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ मिळेल त्या दिशेला त्याला शोधण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. सोमवारी सकाळी वीरांची याचा मृतदेह आढळला. ज्या ठिकाणी वीरांची पाय घसरून पाण्यात पडला होता तेथून सुमारे १०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जयगड पोलिस करत आहेत.