बार्जमधील डिझेल काढून बार्ज रिकामे करणार

उद्यापासून मोहीम; बार्जच्या बचावासाठी देखील प्रयत्न होणार 

रत्नागिरी:- अमावस्येच्या उधाणाच्या तडाख्यात सापडलेले बार्ज वाचवण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. सर्वप्रथम बार्ज मधील डिझेल साठा सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. डिझेल काढण्यात कस्टम विभागाने परवानगी दिली असून मुंबईवरून तेल काढण्यासाठी ट्रक रत्नागिरीला रवाना झाले आहेत. मंगळवार पासून डिझेल काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.   
 

निसर्ग चक्रीवादळ वादळात अँकर टाकून उभे केलेले बार्ज भरकटलेले होते. भरकटलेले बार्ज मिऱ्या बंधाऱ्यावर येऊन धडकले होते. पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ हे बार्ज मिऱ्या किनाऱ्यावर उभे आहे. या बार्जमध्ये 25 हजार लिटर डिझेल साठा आहे. 
अमावस्येच्या भरतीचा मोठा फटका बार्जला बसला रविवारी अमावस्येच्या भरतीवेळी उधाणाच्या अजस्त्र लाटांनी बार्जचे मोठे नुकसान केले. उधाणाच्या लाटा बार्जला धडकून बार्ज वरून जात होत्या. या लाटांच्या माऱ्यात बार्ज मधून माडाला बांधून ठेवलेला दोर तुटला. लाटांच्या माऱ्याने बार्ज किनार्‍यावरील दगडात घासले जात असल्याने बार्जचे मोठे नुकसान झाले. 
   

भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे टेक्निशियन मंचलवार यांनी जहाजाचे कॅप्टन कर्मचारी यांना घेऊन जहाजाची तपासणी केली. जहाजावर 25 लिटर डिझेल असून ते बार्ज मधून बाहेर काढणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कस्टमची परवानगी देखील मिळाली आहे. डिझेल काढताना आजूबाजूचा भाग हा प्रवेश बंद करून मंगळवारी डिझेल काढण्यास सुरुवात केली जाऊ शकते.