जिल्हा रुग्णालयातील कोरोना तपासणी मशीन दोन दिवस बंद

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील मशिन बंद पडले आहे. गेली दोन दिवसात नमुनेच तपासले नसल्याने सुमारे 158 नमुने अडकुन पडले होते. मात्र संबंधित कंपनीचे अधिकारी आल्याने आज सायंकाळी उशिरा मशिन सुरू झाली. 

जिल्हा रुग्णालयात गेल्या महिन्यात 9 तारखेला नवीन कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे ऑनलाईन उद्घाटन झाले. स्थानिकांनी जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा मिळावी, यासाठी रेटा लावल्याने जिल्ह्याला मशिन मिळाले. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने हे मशिन बंद पडले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने तत्काळ संबंधित कंपनीशी संपर्क साधला होता. कंपनीचे अधिकारी दुरुस्तीसाठी आल्याने आज सायंकाळी बंद पडलेली मशिन सुरू झाली. दोन दिवसामध्ये सुमारे 158 नमुने प्रलंबित राहिले आहेत. यामध्ये जयगड येथील ओएनजीसीवरील कर्मचार्‍यांमुळे संसर्ग वाढण्याची भिती असलेल्या गणपतीपुळे आणि जयगड भागातील नमुन्यांचा समावेश आहे. आज रात्री उशिरा तपासणीला लावलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. आज कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 2 रुग्णांना तर जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 2 रुग्ण असे एकूण 4 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.