खरीपासाठी साडेपाच कोटीचे कर्ज वाटप 

रत्नागिरी:- कोरोनामुळे धास्तावलेल्या शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी शासनाने खरीप हंगामात पिक कर्ज तत्काळ उपलब्ध करुन द्या, असे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात वाटप सुरु झाले आहे; मात्र शेतकर्‍यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन कर्ज प्रकरणे करणे शक्य नसल्यामुळे यंदा कर्ज वाटपावर परिणाम होत आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 6 जुनपर्यंत साडेपाच कोटी वाटप झाले होते. 20 जुनपर्यंत त्यात दोन कोटीची भर पडली असून जिल्ह्यात साडेसात कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.

जिल्ह्यात सव्वालाखाहून अधिक सभासद असून 85 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये भात लागवडीचे क्षेत्र सुमारे 70 हजार हेक्टर आहे. गावा-गावात मोठ्याप्रमाणात चाकरमानी मुंबईहून दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती ही तेवढीच वाढली आहे. रुग्ण संख्या अधिक असून एसटी सह खासगी वाहतूक अजूनही बंद आहे. त्याचा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. काहींनी भात पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र यंदा खरीप पीक कर्ज घेण्यावर कोरोनाचे सावट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शेतकरी कमी प्रमाणात पीक कर्ज उचलतात. त्यानुसार बँकांनी कर्ज वाटपाची तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह लीड बँक शाखानिहाय कर्ज देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरडीसीसी बँकेला 55 कोटी रुपयांचे लक्ष देण्यात आले आहे. त्यातील 48 हजार 505 सभासदारांना 7 कोटी 86 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. 36 हजार 253 हेक्टरवर हे कर्ज घेण्यात आले आहे. गतवर्षी याच कालावधीत 7 केाटी 47 लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले होते. एखाद टक्का फरक कोरामुळे पडला आहे.