कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना आश्रय; तिघा हॉटेल व्यवसायिकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कोरोनाची तपासणी झालेली असताना देखील प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिक आणि त्यांचे केस कापणाऱ्या एका नाभिकावर जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

जयगड येथील एका पोर्टवर दोन जहाजे दुरुस्ती कामानिमित्त दाखल झाली होती. या जहाजवरील 13 जणांची रत्नागिरीत कोव्हिड चाचणी करण्यात आली. यानंतर यातील 3 जण गणपतीपुळे येथील हॉटेल अभिषेक, 2 जण हॉटेल विसावा तर आठ जण हॉटेल एकदंत येथे राहिले होते. या 13 जणांची माहिती ठेवण्यापूर्वी प्रशासनाला देणे आवश्यक असताना ती न देता या 13 जणांना आश्रय संबंधित हॉटेल मालकांनी दिला. यापैकी हॉटेल अभिषेक मधील कामगार बाजारपेठेत देखील फिरले. येथील एका केश कर्तनालयात जाऊन केस कापले. या 13 जणांपैकी काहींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
 

कामगारांची माहिती प्रशासनाला न दिल्याने हॉटेल अभिषेकचे मालक प्रसाद त्र्यंबकेश्वर तोडलकर, हॉटेल विसावाचे मालक राजेश श्रीधर केदारी, हॉटेल एकदंतचे मालक प्रसाद कृष्णा बेळगावकर आणि कामगारांचे केस कापणारा हलीम गुलाबनबी शेख या चौघांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन च्या कलमानुसार साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलमानुसार जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.