रत्नागिरी:- एकीकडे कोरोना बाधित रुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असताना दुसरीकडे कोरोना बधितांवर लवकरात लवकर उपचार व्हावेत यासाठी काम करणारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची टीम दिवस रात्र चोवीस तास कार्यरत आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झालीय हा मेसेज मिळाला की या पथकाचे काम सुरू होते. रुग्णाला धीर देत, कुटुंबातील सदस्यांची समजूत काढून एका-एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करावे लागते. स्वतःला देखील एक ना एक दिवस कोरोना होईल ही बाब लक्षात घेऊनच घरातून बाहेर पडताना स्वतःची बॅग घेऊन बाहेर पडायचे, मात्र सेवा देताना कोरोना नाही आम्हाला आमची माणसं महत्वाची अशी भावुक प्रतिक्रिया द्यायची. आतापर्यंत अनेक कोरोना वॉरियर्स उजेडात आले मात्र या कर्मचाऱ्यांनी कोणताही गाजावाजा न करता आपले काम सुरू ठेवले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पथक तालुक्यात कार्यरत आहे. एखाद्या रुग्णाचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आला की हे पथक ऍक्टिव्ह होते. मग दिवस असो किंवा रात्र, ऊन असो किंवा पाऊस जीवाची पर्वा न करता अगदी जयगड पासून गावखडी पर्यंत धावून जाण्याचे काम हे पथक करते. केवळ कोरोनाची लागण झालेल्या रुग्णापर्यंत पोहचल्यावर काम पूर्ण होत नाही. त्या रुग्णाची त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची समजून काढण्याचे काम या पथकातील प्रत्येक सदस्याने आजपर्यंत केले आहे.
रुग्ण उपचारासाठी दाखल करताना या पथकाला अनेकदा अडचणी आल्या मात्र अशा परिस्थितीत देखील या पथकाने आपला संयम ढळू दिला नाही. अशावेळी गोड बोलून समजूत काढून धीर देऊन काम पूर्ण केले आहे. अनेकवेळा रुग्ण घाबरलेल्या स्थितीत असतो अशा वेळी रुग्णाला धीर देण्याचे काम हेच आरोग्य कर्मचारी करतात. रुग्णाला उपचारासाठी दाखल करून या पथकाचे काम संपत नाही, त्या रुग्णाचा कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करणे, रुग्णाला आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम या पथकातील कर्मचारी करतात.
विशेष म्हणजे आपली जबाबदारी पार पाडत असताना या पथकातील प्रत्येक कर्मचारी आवश्यक खबरदारी घेत असतो. अगदी रुग्णापासून सात फूट लांब राहून काम करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर, रुग्णाला पीपीटी किट मधूनच रुग्णालयात घेऊन जाणे आदी बाबींची पूर्तता केली जाते. अशी काळजी घेऊन देखील क्वचित एखाद्या परिस्थितीत कोणानाकोणाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने या पथकातील प्रत्येकजण घरातून बाहेर पडताना स्वतःची कपड्यांची बॅग घेऊनच बाहेर पडतो.
आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात 70 पॉझिटीव्ह रुग्णांना या पथकाने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अत्यावश्यक परिस्थितीत जेवण आणि कपडे देखील उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या मागची या पथकातील प्रत्येक व्यक्तीची भावना इतकीच आहे की आम्हाला प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. जिल्हा परिषदेचे हे पथक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. पथकातील अमित कोरगावकर, सुहास गुरव, तुषार साळवी, प्रदीप महाकाळ, अमर विचारे, रोहिणी किडये, शीतल कदम, जाई न्हीवेकर हे पॉझिटीव्ह रुग्णांना आणण्यासाठी दिवस रात्र चोवीस तास तयार असतात.