विधान परिषद निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याला संधी द्या

सुदेश मयेकर यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

रत्नागिरी:-विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाचपैकी केवळ एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा आमदार निवडून आला आहे. उर्वरित चार आमदार महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचे आहेत. कार्यकर्त्यांना पाठबळ आणि येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला उभारी मिळावी यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

याबाबतचे लेखी पत्र त्यांनी दिले आहे. सार्वत्रीक विधानसभा निवडणूक सन 2019 मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार म्हणून शेखर निकम हे निवडून आले. आज महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या रूपाने सरकार स्थापन झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता, पाच पैकी चार आमदार महाविकासआघाडी मधील इतर पक्षाचे असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाहिजे तशी मदत होताना दिसत नाही. कार्यकर्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.
 

आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ मिळण्यासाठी व होऊ घातलेल्या ग्रामपंचायत , नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, निवडणुकीसाठी मजबूत पाठिंबा मिळावा व राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत विकासकामे होण्यासाठी होणाऱ्या विधानपरिषद सदस्य निवडीच्या वेळी रत्नागिरी जिल्ह्याला प्राधान्य देऊन एक विधान परिषद सदस्य रत्नागिरीतुन द्यावा अशी मागणी सुदेश मयेकर यांनी केली आहे.