रत्नागिरी:- ऐन भातशेतीच्या हंगामात निर्माण झालेली खताची टंचाई सोमवारपासून कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे. सुमारे 800 मेट्रीक टन खत मालगाडीतून रत्नागिरी रेल्वेस्थानकात दाखल होणार आहे. कृषी विभागाकडून शेतकर्यांच्या मागण्या घेऊन ठेवल्या असून खत प्राप्त होताच त्यांना बांधावर उपलब्ध करुन देण्याची तयारी केली आहे.
मंजूर उपलब्ध नसल्यामुळे रत्नागिरी रेल्वेस्थानकात दाखल झालेले खत उतरवण्यात अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे पहिल्या तीन गाड्या सोडल्यानंतर आरसीएफकडून खताची गाडीच पाठविण्यात आलेली नव्हती. परिणामी जिल्ह्यात शेतकर्यांना खतच मिळत नव्हते. कोकणात सर्वाधिक भातशेतीला युरिया खत वापरले जाते. पेरण्यांची सुमारे साठ टक्के कामे पूर्ण झाली असून आता खर्या अर्थाने खताची मात्रा देणे आवश्यक आहे. काही दिवस झाले असून खत मिळाले नाही तर रोपांची व्यवस्थित वाढ होणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकर्यांची तगमग सुरु झाली आहे. या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. संगमेश्वर तालुक्यातील काही शेतकर्यांनी याबाबत आमदार शेखर निकम यांना साकडे घातले होते. त्यांनीही संबंधित कंपनीशी संपर्क साधून खत लवकरच उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. कृषी विभागानेही मजूर उपलब्ध करुन रत्नागिरीत खत उतरवण्यासाठी पावले उचलली आहेत. सध्या शंभर मजूरांची नोंदणी झालेली आहे.
खत उपलब्ध झाल्यानंतर ते शेतकर्यांच्या बांधावर पोच करण्यासाठी रत्नागिरी तहसिलदारांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील काही गावातील शेतकर्यांकडून पैसेही गोळा करुन ठेवलेले आहेत. सुमारे 1200 बॅगांची मागणी नोंदली गेली आहे. चांदोरमध्ये 20 टन, साठरबांबरला 200 पोती तर पालीमधूनही मागणी आलेली आहे. सोमवार रत्नागिरी रेल्वेस्थानकात आठशे टन खत मालगाडीने दाखल होणार आहे. ते खत त्वरीत उतरवण्यात येणार आहे. ट्रकमध्ये भरुन ते सोसायटींमार्फत गावागावात वाटले जाईल. युरिआ, सुफला आणि 1026-26 या तिन प्रकारच्या खतांची मागणी अधिक आहे. चिपळूण, खेड येथील शेतकर्यांनी अलिबाग येथून ट्रकने खत मागवले होते. रत्नागिरी तालुक्यात 84 हजार खातेदार असून 70 टक्के खताचा वापर करतात. जिल्हा दुर्गम भागात मोडत असल्यामुळे वाडीवस्तीवर खत पोचवण्यासाठी शेतकर्यांना भुर्दंड बसत असल्याचे पुढे येत आहे. 45 किलोची एक बॅग 268 रुपयांना मिळते. प्रत्यक्षात ती बॅग अधिक रुपयांनी विक्री केली जात असल्याची चर्चा सुरु आहे.