जयगडमध्ये अमावस्येच्या उधाणात तरुण बुडाला

रत्नागिरी:-अमावस्येच्या भरतीला मासे गरवण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एकजण बुडाला. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या तरुणाचे शोधकार्य सुरू आहे.
 

वीरांची विलास खापले (18, रा. पन्हळी जयगड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावरील ग्रामस्थानी दिलेल्या माहितीनुसार वीरांची हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत मासे गरवण्यासाठी जयगड कासारी येथील बंधाऱ्यावर गेला होता. रविवारी समुद्राला अमावस्येची भरती होती. पाण्याचा जोर नेहमीपेक्षा अधिक होता तसेच पाण्याला करंट देखील होता.

मासे गरवत असताना वीरांची अचानक पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत वीरांची वाहून जाऊ लागला. वीरांची वाहत असल्याची बाब त्याच्या मित्रांच्या निदर्शनास आली. मित्रांनी आरडाओरड सुरू केली. नजीकच्या गावातील ग्रामस्थ मदतीसाठी दाखल होईपर्यंत वीरांची पाण्यात बुडाला. या घटनेची खबर तात्काळ स्थानिक पोलीस पाटील आणि प्रशासनाला देण्यात आली. वीरांचीचा शोध रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र त्याचा शोध लागला न्हवता.