आंग्रे पोर्टचे ट्रान्स्पोर्ट तात्काळ थांबवा

समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव यांची मागणी

रत्नागिरी:- कोरोना बाधित रुग्णांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या सांडेलावगण येथील चौगुले उद्योग समुहाच्या आंग्रे पोर्टचे ट्रान्सपोर्ट थांबवावे अशी मागणी वाटद-खंडाळा येथील जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुतुजा जाधव आणि ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

सांडेलावगण येथे आलेल्या जहाजावरील चार कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले. जहाजावरील कर्मचार्‍यांना गणपतीपुळे, जयगड येथे कंपनीकडून वास्तव्यास ठेवण्यात आलेले होते. त्यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे कर्मचारी संपूर्ण परिसरात फिरले. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातून अन्य लोकांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्याविरोधात ग्रामस्थ संतापलेले आहेत. याबाबत जयगड पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींनी एकत्रित येऊन कंपनीची वाहतूक बंद ठेवावी आणि त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.