वाटद कोंडवाडीची रस्ताकोंडी

सा.बां. विभागाकडून दुर्लक्षामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता

रत्नागिरी:- एच एनर्जीच्या पाईपलाईन खोदाईमुळे वाटद कोंडवाडीचा रस्ता खचला असून भरपावसात वाडीचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.     

एच एनर्जी  गॅस पाईपलाईन ही वाटद कोंडवाडीच्या मध्यातूनच गेली आहे. सद्यस्थितीत या गॅस पाईप लाईनचे काम बऱ्याच अंशी पूर्णत्वास गेले आहे. वाटद कोंडवाडी मधून गेलेली ही पाईपलाईन वाटद कोंडवाडी मध्ये येणाऱ्या रस्त्यांची खोदाई करून टाकण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा रस्ता खोदताना एच एनर्जी. कंपनीने सा. बां. विभागाची परवानगी घेतलेली होती. परंतु रस्ता खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर हा रस्ता खचू नये म्हणून सा.बा.विभागाने कंपनीला हा रस्ता पहिला होता तसा करून देण्यासाठी का सांगितले नाही? कारण रस्ता खोदल्यानंतर हा रस्ता खचू नये म्हणून सिमेंट कॉंक्रीटची बांधी बांधणे गरजेचे होते परंतु असे न करता एच एनर्जी कंपनीने पाईपलाईन टाकून झाल्यानंतर आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे सा.बा .विभागाने एच एनर्जी कंपनीला हा रस्ता खोदल्यानंतर तशाच अवस्थेत टाकून जाण्यासाठी सांगितले होते का? अशी शंका येत आहे.   

पाईपलाईन टाकून झाल्यानंतर हा रस्ता तसाच  ठेवल्यामुळे पावसामध्ये हा रस्ता पूर्णता खचला आहे .त्यामुळे वाडी मध्ये येण्या- जाण्याचा संपर्क तुटण्याचा मार्गावर आहे. येथील ग्रामस्थांनी हा रस्ता कंपनी आणि शासनाने दुरुस्त करून द्यावा अशी मागणी उपविभागीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या पावसामध्ये हा रस्ता पूर्णता खचला आहे. तसेच या रस्ता खोदलेल्या ठिकाणच्या खाली येथील ग्रामस्थांची शेती आहे. पावसात या रस्त्याची संपूर्ण माती या शेतात जाणार असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे .