रत्नागिरी:- महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना निसर्ग वादळाचा जबरदस्त तडाखा बसून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसान भरपाई निकषांत मधून मच्छिमार वर्गाला डावलल्याने श्री दामोदर तांडेल यांच्यावतीने अॅडव्होकेट राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
राज्याच्या महसूल खात्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून राज्य आपत्ती व्यवस्थापनास अहवाल सादर केला होता. त्याच वेळी मत्स्यव्यवसाय खात्याने सुद्धा मच्छीमारांच्या मासेमारी नौका व मासेमारी साहित्याचे नुकसान झालेल्या बाबतचा अहवाल तयार केला होता. परंतु महाराष्ट्र शासनाने केवल महसूल विभागाने सादर केलेल्या अहवालावर मार्गदर्शक तत्व तयार केली आणि त्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिनांक 11 जून 2020 रोजी देण्यात आले. मात्र त्यामध्ये मच्छिमारांचे जे नुकसान झाले त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. दामोदर तांडेल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना महाराष्ट्रातील मच्छिमारांना तात्काल नुकसान भरपाई देण्याबाबत लेखी निवेदन केले होते. परंतू सदर निवेदनाची दखल घेऊन कोणतीही कारवाई होत नसलेने श्री. दामोदर तांडेल यांनी गुरुवार दिनांक 18-06-2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट श्री. राकेश भाटकर यांचेमार्फत जनहित याचिका दाखल केली होती.
अॅडव्होकेटशुक्रवार दि.19-06-2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती श्री. तातेड यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदर याचिकेची सुनावणी झाली. सुनावणीचे वेळी याचिकाकर्ते श्री. दामोदर तांडेल यांच्यावतीने अॅडव्होकेट श्री. राकेश भाटकर यांनी प्रभावी बाजू मांडताना, सरकारने नुकसान भरपाई देताना शेतकरी व मच्छीमार यांच्यामध्ये दुजाभाव करून नुकसान भरपाई दिली गेल्याचे तसेच राज्यघटनेच्या समान तत्त्वाचे उल्लंघन झाल्याचे सुद्धा निदर्शनास आणून दिले. माननीय खंडपीठाने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांना श्री. दामोदर तांडेल यांनी दिलेल्या अर्जावरती तीन आठवड्याच्या कालावधीत सकारात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर याचिकेतील निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल अशी आशा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली आहे.