‘निसर्ग’चा बीएसएनएलला तडाखा; 20 ते 22 हजार ग्राहक अजूनही ‘नॉट रिचेबल’

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) कंपनीही सुटलेली नाही. बीएसएनएलचे यात सुमारे 1 कोटी 36 लाखाच्यावर नुकसान झाले आहे. 40 मिटरचे दोन महत्त्वाच्या टॉवरसह 35 टॉवर बंद पडले आहेत. पाणी गेल्याने 45 लाख किंमत असलेली महागडी इलेक्ट्रॉनिक मशिन बंद पडली आहे. त्यामुळे 20 ते 22 हजार ग्राहक अजून ‘नॉट रिचेबल’ आहेत. दुरुस्ती पार्ट देखील न आल्याने दापोली, मंडणगडचे नेटवर्क आणखी काही दिवस गायब असणार आहे. 

जिल्ह्याच्या किनारपट्टीला मंडणगड, दापोली तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. रत्नागिरीलाही याचा काहीसा फटका बसला. मात्र मंडणगड, दापोली तालुक्यातील 90 टक्केच्या वर घरांची मोठी पडझड झाली आहे. बहुतेक सर्व कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे. सतरा ते अठरा दिवस झालेे तरी अजून अनेक भागातमध्ये वीज पुरवठा नाही. जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पथकांमार्फत वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 80 ते 85 टक्के वीज पुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कंपनीला यश आले आहे. बाधितांना मदतीचा प्रचंड ओघ सुरू आहे. मात्र यातून बीएसएनएल कंपनीही सुटलेली नाही. बीएसएनएल कंपनीला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. 

बीएसएनएलच सुमारे 1 कोटी 36 लाखाच्यावर नुकसान झाले आहे. नुकसानामध्ये 40 मीटरचे मोठे दोन टॉवर बंद पडले आहेत. त्याचबरोबर आणखी 35 मोबाईल टॉवर बंद पडले आहेत. काहींची पडझड झाली आहे. छप्पर कोसळली आहे, भिंती, झाडे पडल्याने इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये पाणी जाऊन ती बंद पडली आहे. सुमारे 45 लाख रुपये किंमत महागडी मशिन बंद पडली आहे. अनेक ठिकाणी यंत्रणेची मोडतोड झाली आहे. याचा फटका सुमारे 20 ते 22 हजार मोबाईल ग्राहकांना बसला आहे. ते गेली सतरा दिवस नॉट रिचेबल आहेत. सेवा पुर्ववत करण्यासाठी आवश्यक असणारे सुट्ट्या पार्टचा देखील अजून कंपनीकडून पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आणखी काही दिवस मंडणगड, दापोली भागातील मोबाईल ग्राहकांना बीएसएनएलच्या रेंजची वाट पहावी लागणार आहे.