धोका टाळण्यासाठी बार्जमधील 25 हजार लिटर डिझेल काढणार

रत्नागिरी:- मिर्‍या येथे अडकलेले त्या जहाजातील सुमारे 25 हजार डिझेल गळतीचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे जहाज काढण्यात यावे, अशी नोटीस आम्ही संबंधित एजन्सीला बजावली आहे. बंधार्‍यावर आदळून जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे डिझेल काढण्यास पहिले प्राधान्य दिले आहे. डिझेल काढल्यानंतर जहाज काढण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांनी दिली. 

निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडून नर्मदा जेटीला लावलेले जहाज भरकटत मिर्‍या समुद्र किनारी लागले आहे. आज सतरा दिवस झाले तरी हे जहाज काढण्याबाबत नुसते प्रयत्नच सुरू आहे. प्रत्येक्षात कार्यवाह सुरू झालेली नाही. जहाजामध्ये सुमारे 25 हजार लिटर डिझेल आहे. तसेच जळक्या ऑईलची गळती सुरू आहे. जहाजाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. म्हणून कोणताही धोका निर्माण होण्यापूर्वी आपली किनारपट्टी सुरक्षित असणे आवश्यक आहे. या उद्देशाने आम्ही संबंधित एजन्सीला लवकरात लवकर जहाज काढण्याबाबत नोटीस दिली आहे.

जहाजावरील क्रू यापूर्वी क्वारंटाईन होते, ते सुटल्यानंतर पोलिस चौकशी पूर्ण झाली. आता परदेशातील जहाज असल्याने कस्टम ड्युटीपासून अन्य कागद पत्रांची चौकशी कस्टम विभागाकडून सुरू झाली आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात असून त्यांनीही जहाज काढण्याबाबत एनओसी दिली आहे. आजच आम्ही जहाजाची पाहणी केली. त्यामुळे लाटांच्या तडाख्यात जहाजाचे बरेच नुकसान झाले आहे. किनारा सुरक्षित राहावा, डिझेलची गळती होऊ नये, यासाठी त्यांना नोटीस बजावून दोन दिवसात डिझेल काढण्याच्या सूचना केल्या आहेत. डिझेल काढल्यानंतर लगेच जहाज काढण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. महानवर यांनी दिली.