जयगडमधून शिपमधील कर्मचाऱ्यांना सोडताना हलगर्जीपणा

रत्नागिरी:– मुंबईतुन रत्नागिरीतील जयगड येथे दाखल झालेल्या ओएनजीसीच्या शिपमधील चौघांना कोरोनाची लागण झाली. ताप आल्याने शिपमधील केवळ पाच जणांना बाहेर काढण्यात आले. उर्वरित कर्मचारी अद्याप जयगड बंदरात उभ्या असलेल्या शिपमध्येच आहेत. पाचजणांना बाहेर काढताना त्यांची माहिती लपवण्यात आली. क्वारंटाईनचा शिक्का देखील मारण्यात आला नाही. हॉटेल व्यावसायिकाने जादा भाडे आकारुन या कर्मचाऱ्यांची माहिती लपवली. हे कर्मचारी गणपतीपुळे येथे फिरल्याने अनेकजण संपर्कात आल्याची शक्यता आहे.

जयगड येथे १७ जूनला ओएनजीसी जहाजातून आलेल्या चार कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. चारही जणांना शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र स्वॅब घेतल्यावर यापैकी ३ रुग्ण गणपतीपुळे बाजारात फिरत होते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या रुग्णांनी गणपतीपुळे येथील एका सलूनमध्ये  केस कापल्याचे देखील बोलले जात आहे. आरोग्य खात्याने या रुग्णांच्या हातावर शिक्का न मारल्याने सुरुवातीला ग्रामस्थांच्या हि बाब लक्षात आली नाही. मात्र आता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

या शिपवर अनेकजण स्थानिक आहेत. ते अद्याप शिपमध्येच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे काय? ही चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिकाने माहिती का लपवली असा सवालदेखील उपस्थित करण्यात येत आहे. पॉसिटीव्ह रिपोर्ट आल्यानन्तर कर्मचारी हॉटेल मधून पळून जात होते त्यांना पळून जाण्यासाठी मदत देखील हॉटेल व्यावसायिकाने केल्याची चर्चा सुरु आहे.