स्थलांतरामुळे कामगारांचा तुटवडा; ऐन हंगामात जिल्ह्यात खतांची टंचाई

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रत्नागिरीतील अनेक परराज्यातील कामगार गावी परतल्यामुळे सध्या मजूरांचा तुटवडा जाणवत आहे. कोकण रेल्वेच्या मालगाडीतून रत्नागिरीत आलेले खत उतरवण्यास कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. खतच न आल्यामुळे जिल्ह्यात खताची टंचाई जाणवत असून ऐन भातशेतीच्या हंगामात शेतकर्‍यांना खत देता खत अशी म्हणत फिरण्याची वेळ आली आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यासाठी वीस हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली होती; मात्र कोरोनाने जिल्ह्यात पाय पसरायला सुरुवात केल्यानंतर गडबड सुरु झाली. कामे नसल्यामुळं बहुतांशी परराज्यातील कामगार गावी परतले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी या कामगारांअभावी कामे रखडली आहेत. अलिबाग तुर्भे येथून रत्नागिरी जिल्ह्यात युरिया आणि सुफला ही खते कोकण रेल्वे ने आणली जातात. पहिल्यांदा दोन गाड्यातुन सुमारे साडेचार हजार टन खत दाखल झाले. ते खत उतरवण्यासाठी मंजूर उपलब्ध नव्हते.  त्यामुळे गाडी बराच काळ रेल्वे स्थानकात उभी राहिली. त्याचा भूर्दंड आरसीएफ कंपनीला बसला. रेल्वेने त्यांच्याकडून थांबलेल्या कालावधीची जादा रक्कम घेतली. त्यामुळे तिसरी गाडी पाठवण्यापूर्वी कंपनीकडून मंजूर उपलब्ध करून ठेवावे अशी सूचना कृषी विभागाला केली होती. गेले आठवडाभर मंजूर शोधण्यात प्रशासनाचा वेळ गेला. तोपर्यत भात लावणी सुरु झाली होती. लावणीनंतर खत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मंगळवारी (ता. 16) 1300 मेट्रिक टन खत आले. ते उतरवण्यासाठी रत्नागिरी तहसीलदर यांनी मजूर व्यवस्था केली होती. सध्या शंभर मजूर रेल्वे स्थानकात उपलब्ध आहेत. आलेले खत तालुक्यात पाठवण्यात आले आहे. परंतु मागणीच्या तुलनेत खत कमी असल्यामुळे शेतकरी दुकानात गर्दी करु लागले आहेत. संगमेश्‍वर येथे एका केंद्रावर दोनशे बॅगा खत उपलब्ध होते. ते घेण्यासाठी गुरुवारी सकाळी झुंबड उडाली होती.

समाधानकारक पाऊस सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील भात पेरणी ची कामे वेगाने सुरु आहेत. मात्र खटाचा पुरवठा झालेला नसल्यामुळे  नसल्यामुळे शेतकर्‍याची पंचाईत झाली आहे. खत मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागत आहे. कोरोनातील लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांना बांधावर जाऊन खते, बियाणे उपलब्ध करुन द्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या; मात्र रत्नागिरीत अजूनही परिस्थिती गंभीर असून कृषी विभागाकडून यावर उपाययोजना करण्यात यश आलेले नाही. जिल्ह्यातील पेरणीची सुमारे 60 टक्केहून अधिक कामे पूर्ण झाली असून खताचा पत्ता नसल्यामुळे शेतकर्‍याची चिंता वाढली आहे.