रत्नागिरी:- तिवरे धरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पावसाळ्यापूर्वी पावले उचलण्यात आली आहेत. कोरोनाची टाळेबंदी सुरू असतानाही प्राथमिक दुरुस्त्या करून घेण्यात आल्या असून सर्व धरणे सुस्थितीत आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांवर पहारेकरी, चौकीदार नेमण्यात आले आहेत. कुवारबाव येथील सिंचन भवनात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पूर्ण झालेले एकूण 1 मध्यम व 30 लघु पाटबंधारे, 5 को. प. बंधारे असे एकूण 36 बंधारे आहेत. मागील वर्षी 2 जुलैनंतर धरण सुरक्षितता संघटना नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धरणांची तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालानुसार काही धरणांची किरकोळ दुरुस्ती आवश्यक होती. त्यामध्ये काही धरणांच्या माती भरावातून, विमोचनातून किंवा सांडव्यातून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व धरणांच्या दुरुस्ती कामांचे प्रस्ताव कोकण विकास महामंडळाच्या ठाणे कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. त्यातील 16 दुरुस्ती कामांना मंजुरी मिळाली होती. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. प्रामुख्याने निवे, मोरवणे या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे सुरू आहेत. कोरोनातील टाळेबंदीमुळे कामे वेळेत सुरू करता आलेली नव्हती; परंतु अत्यावश्यक दुरुस्ती करून धरणांना धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. या कक्षाच्या माध्यमातून धरणातील पाणीसाठा, सद्यःस्थिती, पावसाचे प्रमाण याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे माहिती दिली जाते. सर्व धरणांची पावसाळ्यापूर्वी पाहणी झालेली आहे. या पाहणीतून सर्व धरणे सुरक्षित असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
पावसाळ्यात पर्यटकांनी जाऊ नये यासाठी आवश्यक ते सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यातील काजळी नदी, जगबुडी नदी, मुचकुंदी नदी, अर्जुना नदी, शास्त्री नदी, वाशिष्ठी या नद्यांचे रेड लाईन व ब्ल्यू लाईन सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचे रेखाचित्र जलसंपदा विभागाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी अपलोड करण्यात आलेले आहे.