गुटखा विक्री करणार्‍या दोन दुकानांवर छापा

लांज्यात कारवाई ; दुकाने सील, 45 हजाराचा गुटखा जप्त

रत्नागिरी:- गुटखा, तंबाखु, पानमसाल्याची विक्री करणार्‍या दुकानदारांना अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. लांजा बाजारपेठेत दोन दुकानांवर छापे टाकून सुमारे 45 हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित दुकानांना सील ठोकून लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शासनाने गुटखा, तंबाखु, पानमसाला याला बंदी घातली आहे. तरी छुप्या मार्गाने आणि छड्या दराने याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर ठाण्याचे जॉईन कमिश्‍नर शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी जी. एम. बंबाळे, पी. पी. गुंजाळ, एस. आय. हश्मी या पथकाने ही कारवाई केली. अन्न सुरक्षा कायदा व मानदे कायदा 2006 चे उल्लंगन केल्या प्रकरणी लांजा येथील रियाझ रशीद महालदार (लांजा बाजारपेठ) आणि संजय विश्‍वास वाघाटे (लांजा बाजारपेठ) या दोन्ही दुकानांवर या पथकाने छापे टाकले. यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या गुटखा, तंबाखु, पान मसाला आदीचा साठा व विक्री केल्याचे निदर्शनास आले. संतोष वाघाटे यांच्या दुकानातून 23 हजार 970 तर रियाझ मालदार यांच्या दुकानातून 22 हजार 389 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दुकानेही सील करण्यात आली आहे. या प्ररकरणी अन्न व औषध प्रशासनाचे दशरथ बांबळे यांनी तक्रार दिली असून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.