ई-पास नसणाऱ्यांना जिल्हा प्रवेशबंदी ; कशेडी चेकपोस्टवर १५ पोलिसांची कुमक तैनात, कडक तपासणी

खेड:-  मुंबई, पुणेसारख्या हॉटस्पॉटमधून कोकणात दाखल होणाऱ्या वाहनांबाबत प्रशासनाकडून पुन्हा एकदा नव्याने निर्बंध घातले असून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ई-पास नसणाऱ्या वाहनचालकांना यापुढे जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. तसेच कशेडी येथून आल्या पावली माघारी पाठवले जाणार आहे. त्यासाठी ई- पास असणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्यात येण्यासाठी प्रवेश मिळणार आहे.        

जिल्ह्यात किंबहुना कोकणात कोरोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केल्यानंतरच जिल्ह्यात सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या भीतीने असंख्य चाकरमानी मुंबई, पुणे येथून पायी प्रवास करत गावी दाखल होत होते. या सर्वांना कशेडी घाट येथील चेकपोस्टवर अडवून क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, त्यानंतर निर्बंध शिथिल करून वाहनांना थेट गावी जाण्याची मुभा मिळाली. मात्र चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने कशेडी चेकपोस्टवर पुन्हा वाहनांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.        

पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कशेडी चेकपोस्टवर १५ पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या विन्हेरेमार्गेवर देखील वाहने येण्याची शक्यता कायम असल्याने या ठिकाणी स्थानिक व वाहतूक पोलीस यांच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे.