मुंबई-गोवा महामार्ग पावसाळ्यात चोवीस तास देखरेखीखाली

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महार्गाचे चौपदरीकरण सुरु असल्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याला सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम सज्ज झाला असून पाच विभागांमध्ये बारा पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच धोकादायक 49 ठिकाणी दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत.

महामार्गाचे चौपदरीकरण सुरु केल्यानंतर रस्त्यावर माती येणे, पाणी साचून राहणे, दरड कोसळणे यासारखे प्रकार गेली दोन वर्षे पावसाळ्यात उद्भवत होते. त्यामुळे वाहतूक खंडित होत होती. यंदा तिसरे वर्षे असून चौपदरीकरणाचे कामही वेगाने सुरु होते. सध्या पावसाळ्यात रस्त्यांची कामे थांबविण्यात आली आहेत. दुरुस्तीमुळे वाहतूकीत खंड पडू नये यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पहिल्याच बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन आराखडा बांधकाम विभागाकडून तयार केला. दरवर्षी तयार केलेले झोन कमी होते; मात्र यंदा झोनमध्ये अंतरानुसार टप्पे करण्यात आले आहे. त्या-त्या ठिकाणी आपत्तीकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. चौपदरीकरणाचे काम करत असलेल्या ठेकेदारांमार्फत आवश्यक ती साधनसामग्री तिथे उपलब्ध असून त्यावर एक अधिकारी नेमण्यात आला आहे. संबंधित विभागातील कार्यालयांचे नंबर महामार्गावर फलकांमार्फत उभारण्यात आले आहेत.

चिपळूण, साखरपा, रत्नागिरी, लांजा, सावंतवाडी असे विभाग केलेले असून त्याची जबाबदारी विभागिय अभियंता, सहाय्यक अभियंता, विभागिय अधिकार्‍यांवर सोपवलेली आहेत. या विभागांचे टप्पे केले असून त्या ठिकाणी यंत्रणा ठेवलेली आहे. त्यात चिपळूणात 3, रत्नागिरीत 2, साखरपा 2, खारेपाटण 3 आणि सावंतवाडीत 2 भाग आहेत. जीप, ट्रक, रोलर यासह माती काढण्यासाठी जेसेबी ठेवण्यात आलेला आहे. दिलेल्या झोनमध्ये कोणतीही अडचण आल्यास अल्पावधीत तिथे पोचण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. पावसाळ्यापुर्वी दुरुस्तीसाठी महामार्गावर 49 धोकादायक ठिकाणे निश्‍चित केलेली होती. त्या ठिकाणी ज्या दुरुस्ती सुचवलेल्या होत्या, त्याची पुर्तता केलेली आहे. त्यामध्ये रस्त्यावर माती येणे 5 ठिकाणे, दरीकडे रिबन लावणे 1, गटारे सफाई करणे 5 ठिकाणे होती. बोर्ड, डेरीनेटर, रेलिंग लावणे अशी 30, रस्त्यांवरील खड्डे भरणे 2, साईडपट्टी खचणे 12 ठिकाणे होती. सुचवलेल्या उपायोजनांची पूर्तता केल्यामुळे पावसाळ्यात धोका उद्भवणार नाही असा विश्‍वास बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.

घाट सुस्थितीत
मुसळधार पावसामध्ये घाटरस्ते बंद होऊ नयेत यासाठी बांधकाम विभागाकडून पावले उचलण्यात आली आहे. जिल्ह्यात दहा घाट असून ते सुस्थितीत आहेत. त्यात कामथे, आगवे, आरवली, बावनदी, देवधे, राजापूर, वाकेड, झाडगाव, दाभोळे, आंबा यांचा समावेश आहे. आवश्यक त्या दुरुस्त्या केलेल्या आहेत.