भर पावसात जिल्ह्यात 161 वाड्या टंचाईग्रस्त 

रत्नागिरी:- जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरीही गेल्या आठवड्यात 80 गावातील 161 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला. सध्या मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे या आठवड्यात टँकर कमी होतील असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या दिवसागणित वाढत होती; मात्र 2 जुनला निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने टँकरची मागणी थांबली. पुढील आठवडाभरात काही गावांमध्ये टँकरने पाणी सुरुच होते. 9 जुनपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरीही त्यात सातत्य नव्हते. गेल्या दोन दिवसात चित्र बदलले असुन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. मागील आठवड्यात 8 ते 14 जुन या कालावधीत जिल्ह्यातील 161 वाड्यांना 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. 1,523 फेर्‍यांद्वारे 23 हजार 571 लोकांना पाणी पुरवठा केला गेला. गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर या तिन तालुक्यांनी योग्य नियोजन करत तालुका शेवटपर्यंत टँकरमुक्त ठेवण्यात यश मिळवले.