सैतवडे येथे नेटवर्क गायब; विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थ हैराण

रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथे गेल्या काही दिवसांपासुन मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत आहे. गावामध्ये आयडिया व बीएसएनएल या दोन कंपन्यांचे नेटवर्क मिळत होते. पण आता ते ही बंद झाले आहे. गुहागर तालुक्यातील पडवे गावाच्या डोंगरावर असणाऱ्या टॉवरचे नेटवर्क कधी कधी मिळत होते पण निसर्ग चक्रीवादळानंतर वीजपुरवठा अनियमित होत असल्याने ही सेवा वारंवार खंडित होत आहे.

निसर्ग वादळानंतर वीजपुरवठा अनियमित झाल्याने त्यावर अवलंबून असणारी मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासुन या गावातील लोकांचा नेटवर्कमुळे संपर्क तुटला आहे. जर गावात एखादी वृद्ध व्यक्ती आजारी पडली तर डॉक्टरांना नेमका फोन तरी कुठुन आणि कसा करायचा हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.आता तर शाळाही ऑनलाईन सुरु झाली आहे. मोबाईल नेटवर्कच नसल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास तरी कसा करावा? शिक्षकांनी दिलेले ऑनलाईन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. वेळोवेळी तक्रार करुन सुद्धा कंपनी व प्रशासन लक्ष देत नाही. जर लवकरच प्रश्न मार्गी नाही लागला तर आंदोलनाचा इशारा सैतवडेतील ग्रामस्थांनी दिला आहे.