पोलीस रेकॉर्डवरील गुंडाच्या घरी सापडली तलवार 

रत्नागिरी:- जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील संशयित तरुणाच्या घरावर छापा मारून शहर पोलिसांनी एक तलवार जप्त केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल उर्फ शुक्रान हकीम (वय-२३,रा.बेलबाग) याच्या घरी तलवार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य त्याच्या हातून घडण्याची भीती होती. त्यामुळे शहर पोलीस त्याच्या मागावर होते.मंगळवारी रात्री उशिरा शहर पोलिसांच्या एका पथकाने बेलबाग परिसरात सापळा रचला होता.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रानच्या घरात तलवारी असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारून एक तलवार हस्तगत केली आहे. शुक्रान विरोधात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हि कारवाई शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, पोहेको.जयवंत बागड, राहुल घोरपडे, प्रवीण बर्गे, प्रवीण खांबे, गणेश सावंत, योगेश नार्वेकर यांनी केली.