पावसाळ्यात जिल्ह्यातील 197 गावांना पुराचा धोका; पुररेषा निश्चित

रत्नागिरी:- गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 6 नद्यांच्या पूररेषा निश्‍चिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. पाटबंधारे विभागाकडून यंदा याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी पुणे येथील एक एजन्सी निश्‍चित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 197 गावांना पुराचा फटका बसत असून या गावांमध्ये पाण्याच्या पातळीनुसार रेड, ब्लू अशी पूररेषा निश्‍चित करण्यात येणार आहे. रेड पूररेषेमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसली तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या बांधकामांचे करायचे काय, असा प्रश्‍न यंत्रणेपुढे आहे.  

जिल्ह्यातील नदीकाठी असलेल्या गावे आणि शहरांची पूररेषा निश्‍चित करण्याचे काम सुरू झाले आहे. पावसाळ्यात ज्या भागात पूरस्थिती निर्माण होते. त्याठिकाणी हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद होते. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक वेळा जीवितहानी होते. हे टाळण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कापसी नदी, गड नदी, बाव नदी, शास्त्री नदी, सोनवी नदी, गडगडी नदी या सहा नद्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये 197 गावांना पुराचा फटका बसतो. यामध्ये कापशी नदी किनारी असलेल्या 36 गड नदी 27, बावनदी 47, शास्त्रीनदी 64, सोनवी नदी 15, गडगडीनदी 8 एवढ्या गावांचा समावेश आहे. 

गावांमधील शाळा, मंदिरे, महावितरणचे विद्युत खांबावर याचे मार्किंग (खुणा) करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी स्टोन (दगड) टाकून त्यावर मार्किंग करण्यात येणार आहे. पुण्यातील एका कंपनीमार्फत पूररेषा आखण्याचे काम केले जाणार आहे. नदी किनारी होणार्‍या बांधकांमुळेच पूरस्थिती निर्माण होते. परंतु रेड, ब्लू लाइन आखण्यात आल्यानंतर नदीकिनारी भागात बाधकामे करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषांच्या आत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टीने पूररेषा आखणी करण्याबाबत पाटबंधारे विभागाने 1989 मध्ये परिपत्रक काढले आहे. निषिद्ध क्षेत्र, निषेधक पूररेषा, नियंत्रित व नियंत्रक पूररेषा कशा आखाव्यात याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. परंतु जिल्ह्यात अद्यापपर्यंत रेड लाइन, ब्लू लाइन आखण्यात आलेली नव्हती. यावर्षी प्रथमच पूररेषा आखण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.