शिक्षण विभाग सज्ज; शाळा निर्जंतुकीकरनाचे आदेश
रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक सत्राला 1 ऑगस्टपासून आरंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागही सज्ज झाला आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चाकरमान्यांच्या विलगीकरणासाठी घेतलेल्या 737 शाळा शिक्षण विभागाने ताब्यात घेऊन त्या स्वच्छ करुन निर्जंतुकीकरण करुन वापरण्यास घ्या अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या. तर कोरोना विषाणू बाधित तीस गावांमधील शाळांचा निर्णय जिल्हाधिकार्यांच्या सुचनेनंतर घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक सत्र सुरु करण्यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. त्यानुसार बुधवारी (ता. 17) जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी शिक्षण सभापती सुनिल मोरे, शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे, सामान्यप्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे आदी उपस्थित होते. शाळांची पहिली घंटा कधी वाजणार याबाबत उत्स्कुता होती. शासनाच्या सुचनांची अंमलबजावणी कशी करावी याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यात लाखो चाकरमानी दाखल झाले होते. त्यांना क्वारंटाईन करुन घेण्यासाठी 737 जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेतल्या होत्या. 1 ऑगस्टपासून 6 ते 8 वी चे वर्ग सुरु होणार आहेत. त्यासाठी विलगीकरणासाठी घेतलेल्या शाळा स्वच्छ करणे आवश्यक आहेत. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असून त्यादृष्टीने ग्रामपंचायतींकडून ही स्वच्छता केली जावी अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या 2,572 शाळा असून 6 ते 8 वर्ग असलेल्या सुमारे नऊशे शाळांचा समावेश आहे. यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या तीस हजारापर्यंत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने वर्गात उपस्थित ठेवावी लागणार आहे. एकाच वर्गातील मुले अधिक असतील तर तुकड्यांचे वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. एक दिवसाआड वर्ग किंवा तुकडीच्या तासिका घेतल्या जातील, मात्र त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक अत्यावश्यक आहे. वर्गात येणार्या मुलांना मास्क देणे, पिण्याच्या पाण्याची बॉटल्स, डबा या गोष्टी पालकांनी जबाबदारी देणे गरजेचे आहे. शाळेत येणार्या मुलांचे थर्मल स्क्रिनिंग किंवा आरोग्य तपासणीची जबाबदारी त्या- त्या आरोग्य उपकेंद्रांवर सोपवण्यात आली आहे. आजारी मुलांना घरीच ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सव्वाशेपर्यंत आहेत. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, तो कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. जिल्ह्यात 30 कंटेनमेंट झोन आहेत. त्या भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय हा जिल्हाधिकार्यांवर अवलंबून आहे. ऑगस्टपर्यंत बहूतांश क्षेत्र कोरोनातून मुक्त होणार आहेत.
पहिली, दुसरीच्या शाळा सुरु करु नयेत अशा सुचना आहेत. तर 3 व 4 थीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरु केले जातील. याबाबत जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली आहे.