आदर्शवत; वाटदमधील सात वाड्या स्वतःहुन क्वारंटाईन

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद गावाने कोरोनाच्या काळातील धाडसी आणि आदर्श निर्णय इतरांपुढे ठेवला आहे. दोन वाड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने येथील ग्रामस्थांनी संसर्ग रोखण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. स्वतःची सुरक्षा स्वतः करण्यासाठी सोमवारपासून पुढील चौदा दिवस सात वाड्यांनी सामूहिक क्वारंटाईन करून घेतले आहे.

याबाबत स्थानिकांनी तलाठी, जयगड पोलिस आणि वाटद सरपंच यांना निवेदन देऊन याबाबातची सर्व माहिती दिली आहे. अनेक मोठ्या शहरातून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी दाखल झालेले आहेत. बहुतांशी चाकरमान्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून सुरक्षित राहिलेली गावेदेखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. तालुक्यातील वाटद गावामध्ये दोन वाड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने येथील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. प्रशासनाने केलेल्या आधीच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे ग्रामस्थांना आता स्वतःची सुरक्षा स्वतः करावी लागणार आहे. त्यामुळे वाटद गावातील कवठेवाडी, धोपटवाडी, तांबटकरवाडी, किंजळेवाडी, रायवाडी, वडवली आणि पूर्व बौद्धवाडी या 7 वाड्यांनी एक स्तुत्य पाऊल उचलत स्वतःची सुरक्षा स्वतः करण्यासाठी 15 जूनपासून पुढील चौदा दिवस सामूहिक क्वारंटाईन करून घेतले आहे. याबाबत त्यांनी स्थानिक प्रशासनाला सर्व माहिती दिली आहे. ग्रामपंचयायत वाटद मिरवणे अंतर्गत येणार्‍या दोन वाड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याचा संसर्ग थांबविण्यासाठी पुढील चौदा दिवसांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून आमच्या सात वाडीतील ग्रामस्थ स्वतःहून सामूहिक क्वारंटाईन होण्यास तयार झाले आहेत. 

सातही वाड्यातून बाहेर जाणे आणि येणे यावर बंदी घातली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सरपंचांना हे निवेदन देताना वाटदचे माजी सरपंच आप्पा धनावडे, अनंत किंजळे, सुधाकर जोशी, संतोष बारगोडे उपस्थित होते.

चौकट
खंडाळा बाजारपेठ सील करावी
ग्रामपंचायत अंतर्गत येणारी खंडाळा बाजारपेठ ही दशक्रोशीमध्ये मोठी आहे. जाकादेवी गणपतीपुळे, मालगुंड, जयगड, सैतवडे, जांभारी व गुहागर तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थ कामानिमित्त येतात. म्हणून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ती सील करणे अत्यावश्यक आहे.