अरबी समुद्रात चक्रीय स्थिती; उद्यापर्यंत मुसळधार पाऊस

रत्नागिरी:- अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वार्‍याचा वेग वाढल्याने गुरुवार 18 जूनपर्यंत धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. पुढील 24 तास मुंबई सह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाउस होईल असा अंदाज असल्याने रेड ते ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

 दरम्यान मंगळवार पासून जिल्ह्यात धो धो पाऊस सुरू झाला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाच जोर अधिक वाढला आहे. बुधवारी सकाळी मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पावसाचा जोर गुरुवार पर्यंत कायम राहणार आहे.