…अन्यथा सलून व्यावसायिक आत्मदहन करतील

रत्नागिरी:- सलून व ब्युटी पार्लरबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा आत्मदहन करू असा गर्भित इशारा नाभिक संघटनेने दिला असून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

कोरोना संकटामुळे दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने शहर आणि जिल्ह्यातील सलून व्यावसायिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. या व्यावसायिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, दैनंदिन उत्पन्न बंद झाल्याने दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, वीज बिल, उधारीवर घेतलेली सौंदर्यप्रसाधने, खुर्च्या-फर्निचरचे पैसे, कारागिराचा खर्च कसा भागवायचा असा सवाल या व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार सलून दुकाने तर त्यावर दहा हजारापेक्षा अधिक कारागीर कार्यरत आहेत. परप्रांतीय व्यावसायिक आपल्या गावातून मुले आणून त्यांना कामावर ठेवतात. ही मुले मिळणाऱ्या पगारातील थोडा हिस्सा स्वतःच्या जेवणा-खाण्यासाठी ठेवून उर्वरित पगार गावी पाठवतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच, यापैकी बहुतांश मुले गावी निघून गेली आहेत. रत्नागिरीत राहणारे कारागीर, पोटाला चिमटा काढून दिवस काढत आहेत.

स्थानिक सलून व्यावसायिकांची अवस्था अतिशय वाईट आहे. स्थानिक व्यावसायिकांपैकी ८० टक्के जणांनी दुकाने भाड्याने घेतली आहेत, तर पंधरा टक्के दुकाने बँका, पतसंस्था, खासगी वित्तसंस्थांकडून कर्ज काढून विकत घेतलेली आहेत. पाच टक्के दुकाने परपंरागत मालकीची आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच या व्यावसायिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन दुकाने बंद ठेवली टाळेबंदीच्या पहिल्या सत्रापासून आतापर्यंत  केशकर्तनालये पूर्णपणे बंद ठेवून शासन आदेशाचे पालन केले आहे. तीन महिन्यांच्या अवधीनंतर रोजीरोटी पूर्ववत सुरू होईल असे वाटत असताना अचानक केशकर्तनालये, ब्यूटीपार्लर्स पुन्हा बंद करण्याचा नवा आदेश आला आणि आमची जगण्याची उमेदच संपली. महोदय, केशकर्तन हाच आमचा पिढीजात व्यवसाय आहे, त्यावर आमची रोजीरोटी अवलंबून आहे. शेतीवाडी, बागायती वा अन्य कोणताही व्यवसाय नाही. शिवाय बहूतांश केशकर्तनालये ब्यूटीपार्लर्स भाड्याच्या जागेत आहेत. शासननिर्णयानुसार अनिश्चित काळाकरीता दुकाने बंद ठेवावी लागली तर दुकानाचे भाडे , वीज बिल औषधे वा शिक्षणाचा खर्च तथा घर कसे चालवायचे हा यक्ष प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला आहे . टाळेबंदी दरम्यान तीन महिने अक्षरश : उपासमार काढली . आता नव्या आदेशाने आमच्या डोळ्यापुढील अंधार अधिक गडद झाला आहे . तेव्हा आम्हा व्यवसायीकांना शासनाकडून विशेष आर्थिक सहाय्य मिळावे ही विनंती . सलून / ब्यूटी पार्लर व्यावसायिक बांधव – भगिनी सलून / व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी वारंवार शासनाला निवेदन दिलेले आहे मात्र त्याची कोणीही दखल घेतलेली नाही.येत्या दोन दिवसात सलून व ब्युटी पार्लर बाबत निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे नाभिक समाजाचे अध्यक्ष बावा चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी नाभिक समाजाच्या वतीने बावा चव्हाण, महादेव चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण, नितीन जाधव, प्रकाश हातखंबकर, विकास चव्हाण, परिमल खेडेकर, मंदार पवार, अनिल चव्हाण, प्रशांत भोसले यांच्यासह ब्युटीपार्लर असोसिएशनच्या मेधा कुलकर्णी, प्रगती वझे,अपूर्वा गणफुले, श्वेता पवार आदी उपस्थित होत्या.