पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक घरपोच 

रत्नागिरी:-कोरोना प्रादुर्भावमुळे शाळा 15 जूनला सुरु झालेल्या नाहीत परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. ऑनलाईन धडे घेताना विद्यार्थ्यांचे पुस्तकाविना नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तक पुरवण्यात आली. 1 मीटरचे अंतर ठेवून घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना मोफत शालेय पाठय पुस्तक वाटप करण्यात आली. जि प प्राथमिक शाळा भातगाव कोसबी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता असली तरीही जिल्हा परिषद शाळा सज्ज झाल्या आहेत. प्राथमिक शाळांमधील मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. त्यासाठी जिल्ह्यात 6 लाख 71 हजार 495 पुस्तकांचे सेट दाखल झाले आहेत. त्यासाठी 2 कोटी 81 लाख 47 हजार 926 रुपयांचा निधी लागला. कोल्हापूर येथील एजन्सीकडून पुस्तके प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुरवण्यात आली आहेत.

 जि. प. प्राथमिक शाळा भातगाव कोसबी शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठय पुस्तक पुरवण्यात आली. कोरोनामुळे शाळा भरल्या नसल्या तरी ऑनलाईन शिकवण्या सुरू झाल्या आहेत. यावेळी पुस्तकाअभावी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून गुहागरचे शिक्षक संतोष रावणंग व विजय शितप यांनी योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध करून दिली.