त्या वृद्धाच्या संपर्कातील नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

रत्नागिरी:- डायलेसीससाठी आलेल्या सासर्‍यांना कोरोना झाल्यानंतर जावयासह मुलगी व नातवंडांना क्वारंटाईन व्हायची वेळ आली. या सर्वांची कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

१२ जून रोजी मुंबईहून शिरगाव येथील आपल्या जावयाकडे एक वृद्ध आले होते. त्यांना रत्नागिरीत डायलेसीस करायचे होते त्यासाठी ते आले होते. मात्र खाजगी रुग्णालयात आधी कोरोनाची टेस्ट करा असे सांगितल्यानंतर त्यांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले आणि जावयाच्या घरी निघून गेले.

१३ जून रोजी रात्री उशीरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच धावाधाव सुरु झाली. रात्री २ वाजता शिरगाव पुलावर एका चाळीतून त्यांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले. त्या पाठोपाठ जावई, मुलगी आणि २ नातवंडे यांना देखील हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून आरोग्य विभागाने ताब्यात घेतले होते.

त्या ६५ वर्षीय वृद्धाला आयसोलेशन कक्षात दाखल केल्यानंतर जावई, मुलगी व २ नातवंडांचे स्वॅब घेऊन त्यांना आय. टी. आय. मध्ये क्वारंटाईन करण्यात आले. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शिरगाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

कोरोनाबाधीत रुग्णाचा जावई हा शिरगाव परिसरात सर्वत्र फिरला होता. तसेच रत्नागिरी शहरात देखील तो काहींच्या संपर्कात आला होता. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असते तर शिरगाव – गायवाडी परिसर सील करण्याची तयारी आरोग्य विभागाने केली होती. मात्र सुदैवाने जावई, मुलगी व नातवंडे यांचे अहवाल निगेटिव्ह आले.

याबाबतची माहिती त्या परिसरात सर्वत्र पसरल्यानंतर शिरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संपर्कात कोण कोण आले याची माहिती घेण्याचे काम देखील सुरु  झाले होते.