शाळा, वर्गखोल्या दुरूस्तीसाठी साडेसतरा कोटींची गरज

रत्नागिरी:- कोरोनामुळे यंदा नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी अजून एक ते दीड महिन्यांचा कालावधी आहे; मात्र जिल्ह्यातील 235 शाळांसह अडीचशेहून अधिक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी साडेसतरा कोटींची गरज आहे.

जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचे धडे देणारे एकमेव माध्यम आहे. त्यामुळे कमी पट असला तरीही त्या गरजेच्या आहेत. या शाळांच्या दुरुस्ती, नव्याने बांधणी या गोष्टींना आवश्यक निधीचा तुटवडा दरवर्षी भासतो. सर्व शिक्षा अभियानातून निधी मिळत नसल्याने सर्व भार जिल्हा नियोजनवर पडत आहे. त्यातच यंदा कोरोनाचे संकट आल्यामुळे नियोजनच्या निधीलाही कात्री लागली आहे. यामध्ये शाळांची दुरुस्ती, वर्गखोल्या बांधणी अडकण्याची शक्यता आहे. मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना विलगीकरणासाठी जिल्हा परिषद शाळा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी नादुरुस्त किंवा धोकादायक शाळा विलगीकरणाच्या यादीतून वगळण्यात आल्या. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्या शाळांमध्ये मुलांना बसवणे अशक्य असल्यामुळे पर्याय निवडण्यात आले असून त्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून सुचनाही दिलेल्या आहेत.

जिल्ह्यातील 295 शाळांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार केले होते. त्यातील 262 शाळांना मंजूरी मिळाली असून 33 प्रस्ताव अजूनही प्रतिक्षेत आहेत. तसेच आतापर्यंत 261 वर्गखोल्या बांधण्यात आल्या असून 486 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. मुलांना बसण्यास अयोग्य असलेल्या वर्गखोल्यांचा वापर बंद करुन त्याजागी नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडे निधी मागण्यात आला आहे. त्या शाळात विद्यार्थ्यांना न बसविता पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे.