रत्नागिरी:- मंडणगड व दापोली तालुक्यातील नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय जि. प.च्या अधिकारी व कर्मचार्यांनी घेतला आहे. त्यानुसार 500 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे.
मंडणगड व दापोली या दोन्ही तालुक्यांना जि. प. अधिकारी तसेच पदाधिकारी यांनी भेट घेवून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. अनेकांचे संसार तर अक्षरश: उघड्यावर पडल्याचे चित्र दिसून आले.
अधिकार्यांनी हे चित्र बघून त्यांचे मन हेलावले. जि. प. अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे व सर्व विभागाचे खातेप्रमुख यांनी कर्मचार्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्तांसाठी निधी संकलन केला. याला अधिकार्यांबरोबर कर्मचार्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास सर्वच कर्मचार्यांनी आर्थिक मदत केली.
जे पैसे जमा झाले त्यातून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये अगदी चपातीच्या आट्यापासून सर्व कडधान्य, तेल आदी साहित्य देण्यात आले. एकूण 500 कुटुंबांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. कर्मचारी व अधिकार्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत हे काम खरोखरच कौतुकास्पद ठरणारे आहे.
याचे वाटप जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य आण्णा कदम, अरविंद चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी मोहन नागरगोजे, शैलेश आंबुलकर, दापोली पं. स.च्या सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, रत्नागिरी पं. स.चे गटविकास अधिकारी जाधव आदी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त झालेल्या अनेक कुटुंबाकडे जीवनावश्यक साहित्याची कमतरता होती. यामध्ये प्रामुख्याने चपाती किंवा भाकरीचे पीठच नसल्याने त्यांना खाता येत नव्हते. यामुळे पाहणीसाठी गेलेल्या अधिकार्यांसमोर अनेकांनी ही व्यथा बोलून दाखवली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांनी ही बाब लक्षात घेत 5 किलो आटा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या साहित्य वाटपामध्ये त्याचा समावेश करण्यात आला.